आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दरवर्षी विविध विभागात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देत असते. पण आता बुधवारी(27 जानेवारी) आयसीसीने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक महिन्यात तिन्ही क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूचा सन्मान केला जाणार आहे.
जानेवारी महिन्यासाठी भारताच्या आर अश्विन, रिषभ पंत, मोहम्मद सिराज, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या भारतीय खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. या शिवाय जो रुट, स्टिव्ह स्मिथ, रहमानुल्लाह गुरबाज या खेळाडूंनाही नामांकन आहे. महिला क्रिकेटपटूंमध्ये मेरीझन कॅप, नॅडिन डी क्लार्क, निदा दार (पीएके) अशा खेळाडूंचा नामांकनात समावेश आहे.
नामांकन मिळालेल्या भारतीय खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रभावशाली कामगिरी केली होती. त्यांनी दिलेल्या योगदानामुळे भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने ऐतिहासिक विजय मिळवता आला होता.
अशा पद्धतीने दिले जातील पुरस्कार
या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येणार आहे. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येईल.
आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतील.
व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करेल. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतील. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना 90 टक्के तर चाहत्यांच्या मतांना 10 टक्के प्राधान्य असेल. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’
क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ