दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली. भारतीय संघाची उपकर्णधार व सलामीवीर स्मृती मंधाना हिने सलग दोन सामन्यात अर्धशतक झळकावले. आयर्लंडविरुद्ध अखेरच्या सामन्यात तिने 87 धावांची लाजवाब खेळी केली. त्यानंतर तिचे कौतुक करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिची तुलना थेट भारताचा सर्वकालीन महान फलंदाज व माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याशी केली गेली.
भारतीय संघाला आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात आयर्लंडविरुद्ध विजय आवश्यक होता. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. मात्र, डकवर्थ लुईस नियमानुसार 5 धावांनी भारतीय संघ विजयी झाला. यासह भारताचे उपांत्य फेरीतील स्थान देखील पक्के झाले. या सामन्यात सलामीला आलेल्या स्मृतीने नेत्रदीपक फटक्यांनी 56 चेंडूवर 9 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 87 धावांची खेळी केली. याआधी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात देखील तिने अर्धशतक पूर्ण केले होते.
https://www.instagram.com/reel/Co6UFACrxBf/?igshid=YmMyMTA2M2Y=
तिच्या याच फलंदाजीचा एक व्हिडिओ आयसीसीने शेअर केला. दोन भागातील या व्हिडिओमध्ये वरच्या भागात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली व खालच्या भागात स्मृती फलंदाजी करताना दिसते. विशेष म्हणजे दोघांचेही फटके अगदी एकसारखे दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देत आयसीसीने लिहिले, ‘दोघांमधील साम्य चकित करणारे आहे.’
स्मृती ही भारताची दुसरी सर्वात अनुभवी महिला क्रिकेटपटू असली तरी तिच्याकडे भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे अगदी कमी वयात तिची गांगुलीसोबत तुलना होणे, तिच्यासाठी महत्त्वाचे ठरते. गांगुली हा भारताचा यशस्वी फलंदाज तसेच कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या कारकिर्दीत 33,000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा व 64 शतके झळकावली आहेत.
(ICC shared sourav ganguly and smriti Mandhana Similarity Video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत दौरा मध्येच सोडून जाणारा ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या पहिल्यांदाच बनला ‘बापमाणूस’, बाळाचं नावही केलं जाहीर
भारतीय संघाच्या जर्सीवर झळकणार ‘या’ आघाडीच्या ब्रँडचा लोगो! करार पक्का करण्यासाठी बीसीसीआय सज्ज