आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने आज (१५ डिसेंबर) खेळाडूंची नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. या नव्या क्रमवारीत भारताच्या कसोटीपटूंना चांगलाच फायदा झाला आहे. भारताचे तब्बल सहा कसोटीपटू तीन वेगवेगळ्या क्रमवार्यांमध्ये अव्वल दहामध्ये सामील झाले आहेत. भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेलाही या क्रमवारीत फायदा असून, तो दहाव्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी पहिल्या दहा फलंदाजांमध्ये समाविष्ट झाल्याने रहाणेचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
आयसीसीने जाहीर केली नवी क्रमवारी
आज आयसीसीने खेळाडूंची नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा अनुभव स्टीव स्मिथ अव्वलस्थानी आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली व न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांचा क्रमांक लागतो.
रहाणे आला ‘टॉप टेन’मध्ये
कसोटी फलंदाजांच्या या क्रमवारीत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अव्वल दहामध्ये आला. विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांच्यानंतर पहिल्या दहामध्ये असणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आहे. रहाणेचे आता ७२६ रेटिंग गुण झाले आहेत.
रहाणे मागील काही काळापासून नियमितपणे कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये होता. मात्र, न्यूझीलंडविरूद्धच्या टॉम लॅथमने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ८६ धावा काढून रहाणेला मागे सारत पहिल्यांदाच अव्वल दहामध्ये प्रवेश केला होता. परंतु, दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरल्याने त्याला आता हे स्थान गमवावे लागले आहे. त्यामुळे, रहाणेने पुन्हा एकदा सर्वोत्तम कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दहावे स्थान मिळवले.
रहाणे करणार भारताचे नेतृत्व
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत रहाणे भारताचे नेतृत्व करणार आहे. मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतेल. त्यानंतर, मालिकेतील उर्वरित तीन सामन्यात रहाणे भारताचे नेतृत्व करेल. रहाणेने याआधी दोन वेळा आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
संबधित बातम्या:
– नव्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीयांची बल्ले-बल्ले; सहा खेळाडू टॉप टेन मध्ये
– भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून स्टिव्ह स्मिथ बाहेर? या कारणामुळे अर्ध्यातून सोडले सराव सत्र
– हा संघ जिंकेल २-१ ने मालिका, शेन वॉर्नचे कसोटी मालिकेपूर्वी भाकीत