आयसीसी महिला विश्वचषकात (Womens ICC World Cup 2022) सोमवारी (०७ मार्च) न्यूझीलंड संघाने बांगलादेशला ९ विकेट्सने पराभूत केले. आपल्या दुसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंड संघासमोर बांगलादेशने १४१ धावांचे आव्हान ठेवले होते. हे लक्ष्य न्यूझीलंडने ४२ चेंडू अगोदरच १ विकेट गमावत पूर्ण केले. न्यूझीलंड संघाची कर्णधार सुझी बेट्सने (Suzie Bates) ६८ चेंडूत ७९ धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तिच्याशिवाय ऍमेलिया केरने ३७ चेंडूत ४७ धावा केल्या. बांगलादेशच्या सलमा खातूनने न्यूझीलंडची एक विकेट घेतली.
पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. त्यामुळे सामना २७-२७ षटकांमध्ये विभागण्यात आला. न्यूझालंड संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशने ८ विकेट्स गमावत १४० धावा केल्या. सलामीवीर फरगना होकने ५२ धावा केल्या. तसेच, शमिला सुल्तानाने ३३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून खेळताना एमी सदरथवेटने ३ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात ७९ धावा करण्याबरोबरच सुझी बेट्स विश्वचषकात १००० धावा करणारी सहावी, तर न्यूझीलंडचा दुसरी खेळाडू बनली आहे. तिने हे यश विश्वचषकाच्या २२ सामन्यांमध्ये मिळवले आहे. एकदिवसीय विश्वचषकात २१ डावांत ६२.८७ च्या सरासरीने १००६ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने ३ शतक आणि ५ अर्धशतके लगावली आहेत.
न्यूझीलंडचा या विश्वचषकातील पहिला विजय आहे. न्यूझीलंड वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात ३ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. न्यूझीलंड संंघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेश संघाचा हा दुसरा पराभव आहे. पहिला सामना संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात संघाला ३२ धावांनी अपयश आले होते. बांगलादेश गुणतालिकेत ८ व्या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंड संघाचा तिसरा सामना भारतीय संघासोबत होणार आहे. भारताचा हा दुसरा सामना असणार आहे. हा सामना १० मार्चला हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला १०७ धावांनी पराभूत केले आहे. बांगलादेशचा पुढचा सामना १४ मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल खेळण्यासाठी न्यूझीलंडचे खेळाडू टाळणार ‘या’ देशाविरुद्धच्या मालिका, प्रशिक्षकांची माहिती
‘या’ खेळाडूचे पुनरागमन झाल्याने कुलदीप यादवचा पत्ता कट, डे-नाइट कसोटीसाठी टीम इंडियात मोठा बदल
Video: गरमा-गरमी! वॉर्नरला पाकिस्तानी गोलंदाजाकडून मिळाली खुन्नस, मग फलंदाजानेही दिले ‘असे’ उत्तर