आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत एका संघाचा चांगलाच दबदबा आहे. तो संघ इतर कुठला नसून रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ आहे. भारतीय संघाने आपला आठवा सामना रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. या सामन्यात भारताने 243 धावांनी जबरदस्त विजय मिळवला. या विजयासह भारताने सलग आठवा विजय नावावर केला. हा सामना भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यासाठी खूपच खास ठरला. या दिवशीच विराट कोहलीचा वाढदिवस होता. या खास दिवशी त्याने शतक साजरे करत आपल्या 35व्या वाढदिवशी स्वत:लाच खास भेट दिली. सामना संपल्यानंतर संघाने विराटचा वाढदिवस साजरा केला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करताना विराट कोहली (Virat Kohli) याच्या बॅटमधून नाबाद 101 धावांची शतकी खेळी निघाली. ही खेळी त्याने 121 चेंडूंचा सामना करताना 10 चौकारांच्या मदतीने केली. यासह त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. सचिननेही वनडेत 49 शतके केली आहेत. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 विकेट्स गमावत 326 धावा केल्या.
भारतीय फलंदाजांनी कोलकाताच्या कठीण खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेला 327 धावांचे आव्हान दिले. यानंतर भारतीय गोलंदाजही विरोधी संघांच्या फलंदाजांवर तुटून पडले. या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा चमकला. त्याने गोलंदाजी करताना 9 षटकात 33 धावा खर्चून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे विरोधी संघाला 83 धावांवर गुडघे टेकावे लागले.
विराट आणि जडेजासाठी खास सेलिब्रेशन
या दणदणीत विजयानंतर भारतीय संघाने मिळून विराट कोहली याचा वाढदिवस (Virat Kohli Birthday) आणि जडेजाच्या विकेट्सच्या पंचकाचे सेलिब्रेशन केले. आता यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसते की, एका टेबलवर दोन केक ठेवले आहेत. हे दोन्ही केक विराट आणि जडेजा कापताना दिसत आहेत. जडेजा केक कापल्यानंतर विराटला भरवतो आणि केक त्याच्या तोंडाला लावण्याचाही प्रयत्न करतो. अशात हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
Team India and officials celebrating Virat Kohli and Ravindra Jadeja's performance. pic.twitter.com/DBy8pszfWp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 6, 2023
भारतीय संघाचे अविश्वसनीय प्रदर्शन
भारतीय संघाने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत अविश्वसनीय प्रदर्शन केले आहे. भारताने 8 सामन्यांपैकी 8 सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारत 16 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्येही अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. साखळी फेरीविषयी बोलायचं झालं, तर भारतीय संघाचा आणखी एक सामना उरला आहे. हा सामना 12 नोव्हेंबर रोजी बंगळुरूत नेदरलँड्सविरुद्ध खेळला जाईल. (icc world cup 2023 ind vs sa team india celebrated virat kohli birthday see video)
हेही वाचा-
‘…म्हणून तुमच्याकडे विराटसारखा फलंदाज हवा’, ‘किंग’ कोहलीविषयी रोहितची जबरदस्त प्रतिक्रिया
जडेजाचे विराटच्या खेळीबाबत मोठे विधान; म्हणाला, ‘कोहलीचे हे शतक…’