भारतीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत माजी अध्यक्ष शरद पवार व आशिष शेलार यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या गटाचे उमेदवार असलेल्या अमोल काळे यांनी माजी भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव केला. पाटील यांना 25 मतांनी पराभूत व्हावे लागले. मात्र, या निवडणुकीनंतर धक्कादायक बातमी समोर येत आहे.
भारताचे सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व सुनील गावसकर यांच्यासह 8 माजी भारतीय क्रिकेटपटूंनी या निवडणुकीत मतदान केले नसल्याचे सांगितले जात आहे. (MCA Election 2022)
शुक्रवारी (20 ऑक्टोबर) एमसीएची निवडणूक पार पडली. त्यावेळी निवडणूक अधिकारी जे.एस. सहारिया यांनी सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, अजित आगरकर, संजय मांजरेकर, पारस म्हांब्रे, वसीम जाफर, विनोद कांबळी आणि आविष्कार साळवी या क्रिकेटपटूंना मतदान करता येणार नसल्याचे सांगितले होते. या सर्व खेळाडूंनी आपले मतदान ओळखपत्र जमा न केल्याने त्यांना मतदान करता येणार नव्हते.
या निवडणुकीसाठी गावसकर यांनी मतदाता म्हणून आपली नोंदणी केली होती. मात्र, टी20 विश्वचषकासाठी समालोचन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या अगदी काही तास आधी त्यांना ओळखपत्र बनवण्यासाठी सांगितले गेले. वेळेअभावी ते शक्य न झाल्याने गावसकर मतदान करू शकले नाहीत. तसेच, वसीम जाफर बांगलादेश क्रिकेट संघाचे तर पारस म्हांब्रे भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलियात आहेत.
मुंबईत उपस्थित नसलेल्या खेळाडूंना ऑनलाइन पद्धतीने मतदान करण्याची अनुमती द्यावी यासाठी संदीप पाटील यांनी प्रयत्न केले होते. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यास नियमांचे कारण देत मनाई केली. या प्रकरणानंतर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. या निवडणुकीसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या 25 पुरुष व 16 महिला क्रिकेटपटूंना मतदानाचा अधिकार दिला गेला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साधा सुधा नाय विश्वचषकातील दुसरा लांब षटकार हाय, ओडियन स्मिथच्या जबरदस्त शॉटने वेधले सर्वांचे लक्ष
गोळीच्या वेगाने चाललेला चेंडू पठ्ठ्याने झेलून दाखवला, पाहा टी20 विश्वचषकातील अफलातून कॅच