येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संघाचा भाग नसलेले जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि रॉरी बर्न्स या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. सध्या इंग्लंडचा संघ श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत असून त्यांनतर ते भारतात सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी येणार आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या या भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व त्यांचा प्रमुख फलंदाज जो रूट कडे सोपवण्यात आले आहे. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांचे संघात पुनरागमन झाल्याने त्यांचे गोलंदाजी आक्रमण अधिक धारदार झाले आहे. याशिवाय श्रीलंका दौऱ्याचा भाग असलेली अनुभवी वेगवान गोलंदाजांची जोडगोळी जेम्स एंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड संघात कायम आहेत.
या संघातील यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर केवळ पहिला कसोटी सामना खेळणार असून त्यांनतर मायदेशी परतणार आहे. त्याच्या जागी दुखापतीतून सावरत असलेल्या ओली पोपचा संघात समावेश होईल. तसेच कोरोनातून सावरत असलेल्या मोईन अलीचाही या संघात समावेश आहे.
भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होईल. पहिले दोन सामने ५ आणि १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार असून उर्वरित सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.
इंग्लंडचा संपूर्ण संघ:
जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॅक क्राउले, बेन स्टोक्स, टेन लॉरेंस, जॅक लीच, डॉम सिब्ले, बेन फोक्स, ओली स्टोन, क्रिस वोक्स.