भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे खेळला जाणारा पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. खराब प्रकाश आणि मुसळधार पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच संपला. खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात केवळ 4 चेंडू खेळले, ज्यामध्ये संघाला आपलं खातं उघडता आलं नाही. न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी 107 धावा करायच्या आहेत.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं 3 गड्यांच्या मोबदल्यात 231 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी सकाळी टीम इंडियानं आपला स्कोअरबोर्ड पुढे सरकवला. सरफराज खान आणि रिषभ पंत यांच्यात 177 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली, ज्यामुळे चौथ्या दिवसाची पहिली दोन सत्रं भारताच्या नावावर राहिली. सरफराजनं 150 धावा केल्या, तर रिषभ पंत 99 धावा करून बाद झाला. मात्र यानंतर टीम इंडियाची खालची फळी गडगडली.
एकवेळ भारतानं 3 विकेट गमावून 408 धावा केल्या होत्या. परंतु सरफराजची खानची विकेट पडल्यानंतर टीम इंडियाची फलंदाजी अडचणीत सापडली. परिस्थिती एवढी वाईट झाली की, भारतानं शेवटच्या 7 विकेट केवळ 54 धावांत गमावल्या. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात केएल राहुलला मॅट हेन्री आणि विल्यम ओरूर्केच्या घातक गोलंदाजीसमोर केवळ 12 धावा करता आल्या. तर रवींद्र जडेजाही केवळ 5 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे टीम इंडियाचा दुसरा डाव 462 धावांत आटोपला.
एकेकाळी भारतीय संघ खूपच मजबूत स्थितीत असल्याचं दिसत होतं. मात्र चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात न्यूझीलंडनं सामना आपल्याकडे वळवला. किवी संघाला चौथ्या डावात विजयासाठी 107 धावा करायच्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जेव्हा पाहुण्या संघानं केवळ 4 चेंडू खेळले, तेव्हा मैदानावर दाट काळे ढग दाटून आले. अशा स्थितीत खराब प्रकाशामुळे पंचांनी वेळेआधीच खेळ थांबवला. काही वेळाने जोरदार पाऊसही सुरू झाला.
हेही वाचा –
“रोहित भाई, आरसीबीमध्ये ये”, चाहत्याची हिटमॅनकडे मागणी; मजेशीर VIDEO व्हायरल
“हा क्रिकेटपटू 2024 चा जावेद मियांदाद आहे”, संजय मांजरेकर यांचं मोठं वक्तव्य
हर्टब्रेक..!! रिषभ पंतचं शतक अवघ्या 1 धावेनं हुकलं, पुन्हा एकदा ठरला नर्व्हस नाईन्टीजचा बळी