भारतीय संघासाठी फिरकीपटू कुलदिप यादव आणि युजवेंद्र चहल या जोडीने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात उत्तम कामगिरी करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भुमिका पार पाडली आहे.
काल (26 जानेवारी) झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने 90 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताकडून चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स पटकावल्या. त्याने 45 धावा देताना हेन्री निकोलास, कॉलीन डी ग्रँडहोम, टॉम लॅथम आणि इश सोधी या न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना बाद केले होते. त्याचबरोबर युजवेंद्र चहलनेही 2 विकेट्स घेत कुलदीपला चांगली साथ दिली.
या दोघांनी आत्तापर्यंत भारताकडून 37 वन-डे सामन्यात खेळले आहेत. त्यामध्ये कुलदीपने 20.11च्या सरासरीने 77 विकेट्स तर युजवेंद्रने 23.75च्या सरासरीने 66 विकेट्स घेतल्या आहेत.
कुलदीपने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यातही 39 धावा देत 4 विकेट्स पटकावल्या होत्या. यामुळे तो न्यूझीलंडमध्ये सलग दोन वन-डे सामन्यात चार किंवा चार पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिलाच फिरकीपटू ठरला आहे.
चहलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटच्या वन-डे सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करताना 10 षटकात 42 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी तो ऑस्ट्रेलियामध्ये एका वनडे सामन्यात 6 विकेट्स घेणारा दुसराच भारतीय गोलंदाज ठरला होता.
याआधी भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने भारताकडून ऑस्ट्रेलियामध्ये एका वनडे सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर कुलदीप पहिल्या 37 वन-डे मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अफगानिस्तानचा राशिद खान 83 विकेट्ससह अव्वल क्रमांकावर आहे.
पहिल्या 37 वन-डे सामन्यामध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
83 विकेट्स – राशिद खान (अफगानिस्तान)
77 विकेट्स – कुलदीप यादव (भारत)
73 विकेट्स – सकलिन मुश्ताक (पाकिस्तान)
73 विकेट्स – मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
महत्त्वाच्या बातम्या-
–संपूर्ण यादी: गौतम गंभीर, सुनील छेत्रीसह या भारतीय खेळाडूंची २०१९ पद्म पुरस्कारांसाठी झाली निवड
–केवळ ३७ सामने खेळणाऱ्या कुलदीप यादवचा झाला तेंडुलकर-कुंबळे या दिग्गजांच्या यादीत समावेश
–आजपर्यंत २३ भारतीय कर्णधारांना जे जमले नाही ते विराट कोहलीने करून दाखवले