जगभरात सध्या कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनविषयी चर्चा सुरू आहे. नवीन कोरोना विषाणू आधीपेक्षा अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा आगामी दक्षिण अफ्रिका दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जातेय. हा दौरा कमीत कमी एक आठवड्यासाठी पुढे ढकलला जाईल असे सध्या सांगितले जातेय. भारताच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डच्या सतत संपर्कात आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळात हा दौरा पुढे ढकलण्याविषयी चर्चा सुरू आहे.
एका प्रमुख वृत्तपत्राच्या माहितीनुसार, बीसीसीआय सतत दक्षिण अफ्रिका बोर्डसोबत या दौऱ्याला पुढे ढकलण्याविषयी चर्चा करत आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून दक्षिण अफ्रिकेसह इतर अनेक देशांमध्ये नवीन कोरोना विषाणू ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येतेय.
सध्या भारत अ संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. भारत अ संघाच्या या दक्षिण अफ्रिका दौऱ्याविषयी बीसीसीआयने अद्याप कोणतेच मोठे पाऊल उचलले नाहीये. पण, भारतीय संघाच्या आगामी दौऱ्याबाबत मात्र शंका निर्माण झाली आहे. आधी ठरल्याप्रमाणे भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यानंतर ९ डिसेंबरला दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार होता. पण आता याबाबत शंका निर्माण झाली आहे.
भारतीय संघाचा आगामी दौरा नक्की नसल्यामुळेच अद्याप या दौऱ्यासाठी संघाची घोषणा देखील झालेली नाही. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर याबाबतीत बैठक होणार होती, पण ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे ही बैठक देखील अजूनपर्यंत पार पाडलेली नाही.
भारताच्या या आगामी दौऱ्याबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआय सतत दक्षिण अफ्रिका बोर्डसोबत संपर्कात आहे. जोपर्यंत या दौऱ्याविषयी आणि दक्षिण अफ्रिकेतील सध्याच्या परिस्थितीविषयी सविस्तर माहिती मिळत नाही, तोपर्यंत या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील होणे कठीण वाटत आहे. एकदा परिस्थिती स्पष्ट झाल्यानेंतर संघ निवडीसाठी बोर्ड बैठक घेईल. दरम्यान, भारतीय संघाला या आगामी दौऱ्यामध्ये दक्षिण अफ्रिकेसोबत तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळायचे आहेत. १७ डिसेंबर ते २६ जानेवारीदरम्यान हा दौरा आयोजित केला गेलेला आहे.
भारताच्या आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्याचे ठरलेले वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – वांडरर्स, जोहानिसबर्ग, १७ ते २१ डिसेंबर
दुसरा कसोटी सामना – सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरियन, २६ ते ३० डिसेंबर
तिसरा कसोटी सामना – वांडरर्स, जोहानिसबर्ग, ३ त ७ जानेवारी
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय सामना – बोलँड पार्क, पार्ल, ११ जानेवारी
दुसरा एकदिवसीय सामना – न्यूलँड्स, केपटाउन, १४ जानेवारी
तिसरा एकदिवसीय सामना – न्यूलँड्स, केपटाउन, १६ जानेवारी
टी-२० मालिका
पहिला टी-२० सामना – न्यूलँड्स, केपटाउन, १९ जानेवारी
दुसरा टी-२० सामना – न्यूलँड्स, केपटाउन, २१ जानेवारी
तिसरा टी-२० सामना – बोलँड पार्क, पार्ल, २३ जानेवारी
चौथा टी-२० सामना – बोलँड पार्क, पार्ल, २६ जानेवारी