जगभरातील क्रिकेटवर नजर टाकल्यास आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते की, प्रत्येक देशासाठी एखादा तरी भारतीय वंशाचा खेळाडू खेळत असतो. वेस्ट इंडीज तर जवळपास प्रति भारतच आहे. रोहन कन्हाय यांच्यापासून आजच्या सुनील नारायणपर्यंतचे अनेक वेस्ट इंडीज क्रिकेटचे दिग्गज भारताशी संबंध ठेवतात. इंग्लंडसाठी खेळलेल्या भारतीय वंशाच्या खेळाडूंमध्ये महाराजा रणजीत सिंगजी, इफ्तिकार पतौडी ते रवी बोपारा या क्रिकेटच्या तीन पिढ्यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमला आणि केशव महाराज यांचादेखील भारताशी नजीकचा संबंध आहे. न्यूझीलंडसाठी दीपक पटेल आणि जीतन पटेल यांनी सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. आताही रचिन रविंद्र हा नव्या पिढीतील भारतीय वंशाचा खेळाडू न्यूझीलंडसाठी खेळतोय. ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये देखील बरेच भारतीय दिसून येतात. या सर्वांव्यतिरिक्त भारतात जन्म झालेल्या, मात्र पुढे जाऊन इतर देशांसाठी क्रिकेट खेळलेल्या काही अशाच दिग्गज क्रिकेटर्सची माहिती देणारा हा लेख.
एजाज पटेल
भारतात जन्म झालेला आणि न्यूझीलंडसाठी खेळत असलेला डाव्या हाताचा फिरकीपटू एजाज पटेल (Ajaj Patel) हे नाव आज सर्वांना माहित आहे. 2021 मध्ये न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आला असताना त्याने मुंबई कसोटीत ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीच्या एका डावात दहा बळी मिळवणारा तो तिसरा गोलंदाज ठरला होता. मात्र, ज्या मुंबईत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केलेली ती मुंबईच त्याची जन्मभूमी आहे. होय, एजाजचा जन्म मुंबईत झाला होता. वयाच्या आठव्या वर्षी त्याचे कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झाले. त्यानंतर त्याने तिथेच क्रिकेटचे बाळकडू घेतले आणि न्यूझीलंडसाठी खेळू लागला. नियतीची चक्रे फिरली आणि 24 वर्षांनी तो मुंबईतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आला. इथेच त्याने हा विश्वविक्रमही केला. सध्या तो न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा प्रमुख फिरकीपटू आहे.
नासिर हुसेन
भारतात जन्म झालेला आणि इंग्लंडच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला खेळाडू म्हणजे नासिर हुसेन. नासिर यांचा जन्म ही भारतातीलच. त्यावेळचे मद्रास म्हणजेच आत्ताच्या चेन्नई येथे त्याचा जन्म झालेला. त्यांचे वडील रझा जवाद हे तमिळ मुस्लिम होते. रझा यांचा क्रिकेट आणि हॉकी या दोन्ही खेळांमध्ये हातखंडा होता. नासिर हे आपल्या भावासह अनेकदा चेपॉक स्टेडियमवर जायचे, ही आठवण त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे. पुढे, रझा यांनी इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. नासिर इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागले. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या देशाचे नेतृत्वही केले. विस्डेनने त्यांना उत्कृष्ट कर्णधार म्हणून गौरवलेले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी 8000 पेक्षा जास्त धावा बनवल्या. सध्या ते जगातील सर्वोत्तम समालोचकांपैकी एक आहेत.
लिसा स्थळेकर
पुरुष क्रिकेटप्रमाणे एक महिला क्रिकेटरदेखील अशी आहे, जिचा जन्म भारतात झाला मात्र ती ऑस्ट्रेलियासाठी खेळली. तिचे नाव लिसा स्थळेकर. तिचा जन्म पुण्यात झालेला. तिच्या पालकांबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र, ससून रुग्णालयाशी संलग्न असलेल्या श्रीवत्स अनाथाश्रमात तिचे संगोपन होत होते. अमेरिकेत राहणाऱ्या हरेन व सू स्थळेकर या भारतीय दांपत्याने तिला दत्तक घेतले. पुढे ते ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. भारतीय असल्याने जणूकाही तिच्या रक्तातच क्रिकेट होते. तिने ऑलराऊंड कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघात जागा बनवली. वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 बळी घेणारी ती पहिली महिला क्रिकेटर होती. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर तिने निवृत्तीचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, 2012 मध्ये तीने श्रीवत्स अनाथाश्रमाला भेट दिलेली. सध्या ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स फेडरेशनची अध्यक्ष आहे.
जॉन डेव्हिडसन
क्रिकेटपटलावर कॅनडाचे फारसे नाव नाही. मात्र, त्यातही त्यांचे दोन क्रिकेटर्स जगाला बऱ्यापैकी माहित आहेत. त्यातील एक आहे जॉन डेव्हिडसन आणि दुसरा आशिष बगाई. हा आशिष बगाई जन्माने दिल्लीकर. वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत तो दिल्लीत राहिलेला. तसेच त्याने प्रसिद्ध सेंट कोलंबा स्कूलमध्ये आपले शिक्षण घेतलेले. पुढे तो शिक्षणासाठीच कॅनडाला गेला आणि तिथे स्थायिक झाला. वयाच्या 21 व्या वर्षी त्याला कॅनडासाठी खेळण्याची संधी मिळाली. 2003 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने पदार्पण केलेले. यष्टीरक्षक असलेला आशिष कॅनडाचा सर्वाधिक वनडे धावा करणारा फलंदाज आहे. 2011 मध्ये भारतीय उपखंडात झालेल्या वर्ल्डकप वेळी त्याने कॅनडा संघाचे नेतृत्व केलेले. पुढे 2013 मध्ये नोकरी करण्याच्या इराद्याने त्याने वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी क्रिकेटला रामराम ठोकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच