भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) संघातील दुसरा कसोटी सामना (Second Test) १२ ते १६ मार्चदरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दिवस-रात्र (Day Night Test) स्वरुपात खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने यापूर्वीचा मोहाली येथे झालेला पहिला कसोटी सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला असून मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. त्यामुळे आता टी२० मालिकेनंतर कसोटी मालिकेतही श्रीलंकेला क्लिन स्वीप करण्यावर भारतीय संघाची नजर असेल. दरम्यान या सामन्यात भारतीय संघ आणि भारतीय खेळाडूंना बरेच विक्रम (Records In Pink Ball Test) करण्याचीही संधी असेल.
सलग १५ वी कसोटी मालिका जिंकण्याची संधी
भारतीय संघाने जर श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकली, तर संघाचा हा घरच्या मैदानावरील सलग १५ वा कसोटी मालिका विजय (Consecutive 15 Test Series Win In Home) असेल. भारतीय संघाने २०१२ मध्ये स्वदेशात शेवटची कसोटी मालिका गमावली होती. या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा प्रतिस्पर्धी इंग्लंड संघ होता. मात्र या मालिकेनंतर भारत आजवर मायदेशात कसोटी मालिकेत अजेय राहिला आहे.
भारतानंतर मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रमांक लागतो. त्यांनी आतापर्यंत स्वदेशात खेळताना सलग १० कसोटी मालिका जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हा पराक्रम २ वेळा आहे. प्रथम नोव्हेंबर १९९४ ते नोव्हेंबर २००० पर्यंत त्यांनी सलग १० कसोटी मालिका जिंकल्या होत्या. तर दुसऱ्यांदा जुलै २००४ ते नोव्हेंबर २००८ मध्ये हा संघ १० कसोटी मालिकेत अजेय राहिला होता.
रोहित शर्माचा असेल ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना
बंगळुरू कसोटी भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी अतिशय खास असणार आहे. कारण हा त्याचा ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना (Rohit Sharma 400th International Match) असेल. तो तिन्ही क्रिकेट स्वरूपात मिळून ४०० सामने खेळणारा ८ वा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत ४४ कसोटी, २३० वनडे आणि १२५ टी२० सामने खेळले आहेत.
रोहितपूर्वी सचिन तेंडूलकर (६६४), एमएस धोनी (५३५), राहुल द्रविड (५०५), विराट कोहली (४५७), मोहम्मद अझरुद्दीन (४३३), सौरव गांगुली (४२१) आणि अनिल कुंबळे (४०१) यांनी ४०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
हेही वाचा- दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी
डेल स्टेनच्या पुढे जाणार अश्विन
मोहाली कसोटीत ६ विकेट्स घेत रिचर्ड हेडली (४३१ विकेट्स) आणि कपिल देव (४३४ विकेट्स) यांचा विक्रम मोडणारा आर अश्विन याच्याकडेही दिवस-रात्र कसोटीत मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जर त्याने बंगळुरू कसोटीत ४ विकेट्स घेतल्या तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा आठवा गोलंदाज बनेल. यासह तो दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज डेल स्टेन याला मागे सोडेल. स्टेनने कसोटीत ४३९ विकेट्स घेतल्या होत्या.
कोहलीला शतकाची प्रतिक्षा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत ७० शतके केली आहेत. जर त्याने बंगळुरू कसोटीत अजून एक शतक केले, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक करण्याच्या बाबतीत रिकी पाँटिगची बरोबरी करेल. पाँटिगने आतापर्यंत ७१ आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या (१०० शतके) नावे आहे.
बुमराहकडे ३०० विकेट्सच्या क्लबमध्ये दाखल होण्याची संधी
जर बंगळुरू कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेतल्या, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या ३०० विकेट्स पूर्ण करेल. त्याने आतापर्यंत तिन्ही स्वरुपात मिळून ११५ सामने खेळताना २८५ विकेट्स घेतल्या आहेत. यासह तो भारताकडून ३०० विकेट्स घेणारा १२ वा खेळाडू बनेल. त्याच्या आधी अनिल कुंबळे (९५६), हरभजन सिंग (७०७), कपिल देव (६७८), आर अश्विन (६४८), झहीर खान (५९७), जवागल श्रीनाथ (५५१), रवींद्र जडेजा (४७७), इशांत शर्मा (४३४), मोहम्मद शमी (३७८), अजित आगरकर (३४९) आणि इरफान पठाण यांनी (३०१) आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून! पाकिस्तानी महिला विकेटकीपरचा ‘अद्भूत’ झेल; चाहत्यांंना आली थेट ‘माही’च्या ‘त्या’ कॅचची आठवण
दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी
ऑस्ट्रेलियन खेळाडूचा फायनलमध्ये ‘कॅच विन्स द मॅच’चा प्रत्यय, संघाला १८ धावांनी जिंकून दिला मार्श कप