भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना १८ जुन ते २२ जुन दरम्यान रोझ बाऊल स्टेडियम, साउथटम्पच्या(Southampton) येथे होणार आहे. दोन्ही संघ या आयसीसीच्या या स्पर्धेच्या पहिल्यावाहिल्या विजेतेपदावर नाव कोरण्यास उत्सुक आहेत.
उभय संघांचा सामना इंग्लंडमधील साउथटम्पच्या मैदानावर खेळला जाईल. भारतीय संघाने या मैदानावर 2014 साली आणि 2018 साली असे दोन कसोटी सामने इंग्लंडविरुद्ध खेळले आहेत, पंरतु दोन्ही सामन्यांत भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट अशी की या मैदानावर चेतेश्वर पुजाराने शतक ठोकले आहे आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेची देखील या मैदानावर चांगली कामगिरी राहिली आहे. विशेष म्हणजे मुंबईकर रोहित शर्मा व अजिंक्य रहाणेने येथे चमकदार कामगिरी केली आहे.
2014- इंग्लंडकडून 266 धावांनी पराभूत
या मैदानावर आजपर्यंत 6 कसोटी सामने झाले असून त्यामध्ये तीन सामने अनिर्णित राहिले आहे. 2 वेळा इंग्लंडने विजय मिळवला आहे तर एकदा वेस्टइंडिज संघाने विजय प्राप्त केला आहे. 2014 साली भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यावरील चौथा कसोटी सामना या मैदानावर खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लडने 7 बळी गमावून 569 धावा केल्या. गॅरी बॅलेन्स(156) आणि इयान बेलने (167) धावांची खेळी केली होती. इंग्लंडला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ पहिल्या डावात अजिंक्य रहाणे (54) आणि एमएस धोनी (50) यांच्या खेळीच्या जोरावर 330 धावाच करू शकला. दुसऱ्या डावात इंग्लंडने एलिस्टर कूकच्या 70 धावांच्या मदतीने 205 धावांवर डाव घोषित केला आणि भारतीय संघासमोर 445 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. परंतू लक्ष्याचा पाठलाग करतांना भारतीय संघ 178 धावांवर ढेपाळला. दुसऱ्या डावात रहाणे 52 धावांवर नाबाद राहिला तर मोईन अलीने 67 धावा देऊन महत्वपूर्ण 6 बळी टिपले होते.
2018- इंग्लंडकडून 60 धावांनी पराभूत
या कसोटीत भारताच्या जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि अश्विन यांनी घातक गोलंदाजी करीत इंग्लंडला 246 धावांवर रोखले. पंरतु भारतीय संघाला याचा फायदा उचलता आला नव्हता आणि भारतीय संघ पहिल्या डावात 273 धावांवर आटोपला. केवळ चेतेश्वर पुजाराने 132 धावांची शतकीय खेळी केली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जोस बटलरच्या 69 धावांच्या मदतीने इंग्लंडने 271 धावा केल्या आणि भारतीय संघासमोर 245 धावांचे लक्ष्य ठेवले.लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहली(58) आणि अजिंक्य रहाणे(51) यांनी थोडाफार संघर्ष केला. परंतु मोईन अलीच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघ 184 धावांवरच ढेपाळला. 9 बळी घेणाऱ्या मोईन अलीला सामनावीर घोषित करण्यात आले. अलीने येथे झालेल्या भारताविरुद्धच्या 2 सामन्यांत तब्बल 17 बळी टिपले. तसेच रहाणेने 4 डावांत 3 वेळा अर्धशतक झळकावले होते.
रोहित शर्माने ठोकले आहे शतक-
या मैदानावर भारतीय संघ 3 एकदिवसीय सामने खेळला असून तिन्ही वेळा भारताने विजय प्राप्त केला आहे. 2004 साली केनियाविरुद्ध सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने 98 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 15 वर्षांनी 2019च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने रोहित शर्माच्या(122) धावांच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेवर 6 गडी राखून विजय मिळवला होता. विश्वचषकातीलच दुसऱ्या एका सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 11 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात मोहम्मद शमीने 4 तर जसप्रीत बुमराहने 2 बळी घेतले होते.
या मैदानावर न्यूझीलंड अजेय-
न्यूझीलंडचा संघ आजपर्यंत या मैदानावर अपराजित राहिलेला आहे. इथे त्यांनी एकही कसोटी सामना खेळला नसला तरी 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी एक सामना रद्द झाला आणि इतर दोन सामन्यांत 2013 आणि 2015 साली त्यांनी इंग्लंडला मात दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
–जेव्हा क्रिकेटपटू बुमराहची बायकोच आली त्याची मुलाखत घ्यायला, पुढे झाले असे काही की
–जडेजाला अंतिम ११मध्ये संधी दिलीच पाहिजे,माजी खेळाडूने जडेजावर व्यक्त केला विश्वास
–कारकिर्दीदरम्यान होणाऱ्या टीकांना कसा सामोरा जातोस? अजिंक्य रहाणेने दिले मन जिंकणारे उत्तर