क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या बाबतीत असे म्हटले जाते की, कोणत्याही प्रकारचा चेंडू टाकावा परंतु नो बॉल कधीही टाकू नये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही गोलंदाज होते, ज्यांच्याकडून नो बॉल टाकण्यासारखी चुक होत होती. परंतु, त्यांनी नेटमध्ये सराव करुन स्वत:मध्ये सुधारणा केली. तसं पहिलं तर, भारतीय संघात फिरकीपटूंपेक्षा जास्त वेगवान गोलंदाजांनी नो बॉल टाकले आहेत. पण जर एखाद्या गोलंदाजांकडून नकळत एखादा नो बॉल टाकला गेला आणि त्याच्या त्या चेंडूमुळे एखाद्या महत्त्वाच्या फलंदाजाची विकेट हुकली. पुढे जाऊन त्याच फलंदाजांने फटकेबाजी करत आपल्या संघाला पराभूत होणारा सामना जिंकून दिला तर…
भारतीय संघासोबत असे घडले आहे. भारताच्या गोलंदाजांनी ३ महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये नो बॉल टाकल्यामुळे विरुद्ध संघातील महत्वाच्या फलंदाजाची विकेट हुकली आणि त्याने पुढे आपल्या संघाला हारता सामना जिंकून दिला. या महत्त्वाच्या स्पर्धां म्हणजे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी होय.
तर जाणून घेऊया त्या ३ नो बॉल्सविषयी ज्या भारतीय संघाला खूप महागात पडल्या.
India Loss Tournament Due To No Ball
रविश्चंद्रन अश्विन- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१६ उपांत्य फेरी
३१ मार्च २०१६ला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात २०१६ला टी२० विश्वचषकाचा उपांत्य फेरी सामना झाला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करत भारताने २ विकेट गमावत १९२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतानी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने पहिल्या ३ षटकात २ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लेंडल सिमन्सचा १८ धावांवर शॉर्ट थर्ड मॅनवरती उभा असलेल्या जसप्रीत बुमराहने झेल पकडला होता.
त्यावेळी आर अश्विनने तो चेंडू टाकला होता. सर्वांना वाटले की सिमन्सची आता विकेट गेली आणि भारत सहज सामना जिंकेल. परंतु, पंचानी त्याला थांबायला सांगितले आणि नो बॉल चेक करुन घेतला. तेव्हा दिसले की, अश्विनचा पाय क्रीजच्या बाहेर होता आणि तो नो बॉल घोषित करण्यात आला. या जिवनदानाचा फायदा घेत सिमन्सने पुढे १९.४ षटकात नाबाद ८२ धावा करत संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला.
हार्दिक पंड्या- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१६ उपांत्य फेरी
हार्दिक पंड्यानेही २०१६मधील टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरित वेस्ट इंडिजविरुद्धच नो बॉल टाकला होता. विशेष म्हणजे, पंड्याने सिमन्सला तो नो बॉल टाकला होता, ज्याला १८ धावांवर असताना आर अश्विनच्या नो बॉलमुळे जिवनदान मिळाले होते. पंड्याच्या नो बॉलवेळी सिमन्सने ५० धावा केल्या होत्या आणि हा नो बॉल भारताला खूप महागात पडला होता. सिमन्सने दुसऱ्यांदा मिळालेल्या संधीचा फायदा घेत ८२ धावा करत वेस्ट इंडिजला तो सामना जिंकवून दिला होता.
जसप्रीत बुमराह- भारत विरुद्ध पाकिस्तान, २०१७ अंतिम सामना
जसप्रीत बुमराहच्या या नो बॉलला क्वचितच कोणता क्रिकेटप्रेमी विसरु शकला असेल. २०१७मधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बुमराहने नो बॉल टाकला होता. फखर जमान चौथ्या षटकात ३ धावांवर असताना यष्टीमागे असणाऱ्या एमएस धोनीने त्याचा चेंडू झेलला होता. परंतु, बुमराहचा पाय क्रीजच्या बाहेर असल्यामुळे तो नो बॉल ठरला आणि फखार जमान बाद व्हायचा वाचला.
पुढे तो असा खेळला की, त्याने ११४ धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ५० षटकात ३३८ धावा केल्या. भारताला त्यांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फक्त १५८ धावा करता आल्या होत्या आणि भारताने १८० धावांनी ट्रॉफी गमावली होती. बुमराहला त्याच्या नो बॉलसाठी टीकेचा सामना करावा लागला होता.
ट्रेंडिंग लेख-
टीम इंडियासाठी दिवस रात्र घाम गाळणाऱ्या ‘या’ ३ खेळाडूंना…
क्रिकेटमधील पुढील फॅब ४ होण्याची क्षमता असलेले ४ खेळाडू
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप ५ भारतीय फलंदाज