भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाला दुखापतींनी सतावले आहे. भारतीय संघातील अर्धाहून अधिक खेळाडूंना दुखापती झाल्या असून रोज यात नवीन भर पडत आहे. आता असे समोर येत आहे की भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची चौथा कसोटी सामना खेळणार नाही.
त्याच्या ओटीपोटीत ताण आल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे एका बीसीसीआयच्या सुत्राने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले आहे. त्यामुळे भारतीय संघाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण याआधीच भारताचे अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.
India pacer Jasprit Bumrah ruled out of fourth Test against Australia due to abdominal strain: BCCI Sources
— Press Trust of India (@PTI_News) January 12, 2021
भारताला दुखापतींचे ग्रहण –
नुकत्याच सिडनी येथे पार पडलेल्या कसोटी दरम्यान अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे ते आधीच ब्रिस्बेन कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. एवढेच नाही तर चालू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विहारी, बुमराह किंवा रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त होणारा पहिले भारतीय खेळाडू नाही. त्यांच्याआधी मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल हे तिघेही दुखापतीमुळे या दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहे. शमीला पहिल्या कसोटीत, उमेशला दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली. तर केएल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाली.
तसेच इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या दौऱ्याआधीच दुखापतग्रस्त असल्याने त्यांची भारतीय संघात निवड झाली नव्हती. त्याचबरोबर रोहित शर्मा देखील दुखापतीमुळे वनडे, टी२० मालिकेत आणि कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळला नव्हता.