कानपूर कसोटीत पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने शतक झळकावून संघ व्यवस्थापनासमोर मोठी अडचण निर्माण केली आहे. अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या डावात १७१ चेंडूत १०५ धावा केल्या होत्या. आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटची कसोटी मुंबईत खेळायची आहे. या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली संघात परतणार आहे. तेव्हा मधल्या फळीत कुणाला खेळवण्याचे असा पेच आता संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली मालिकेतील या दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करणार आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनासमोर सर्वात मोठा प्रश्न असेल की कोहली त्याच्या जागेवर खेळेल तेव्हा कोणत्या खेळाडूला संघाबाहेर करावे? शुभमन गिल सलामीवीर म्हणूम मयंक अगरवालसोबत खेळेल, हे निश्चित असल्याचे मानले जात आहे.
त्याचवेळी श्रेयस अय्यरने शतक झळकावून मधल्या फळीत आपले स्थान पक्के केले आहे. चौथा खेळाडू यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा राहील. अशा परिस्थितीत आता फक्त दोनच खेळाडू उरले आहेत, तर जे कोहलीसाठी बलिदान देऊ शकतात. हे दोन्ही खेळाडू म्हणजे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा. दोन्ही खेळाडू बऱ्याच दिवसांपासून मोठ्या खेळी करण्यासाठी झगडत आहेत. अशा स्थितीत कोहलीसाठी रहाणेला प्लेइंग-११ मधून वगळले जाण्याची शक्यता आहे.
कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणे न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या कसोटीत कर्णधारपद भूषवत आहे. रहाणे आणि पुजाराला पुढील कसोटीत स्थान मिळवण्यासाठी कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात स्वत:ला सिद्ध करावे लागेल. रहाणेने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात ६३ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याने शेवटच्या २० डावात केवळ ४०७ धावा केल्या. ज्यात दोन अर्धशकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याची सरासरी २०.३ इतकीच राहिली आहे.
असेच काहीसे चेतेश्वर पुजाराच्या बाबतीत घडले. पुजाराने जानेवारी २०१९ मध्ये शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. गेल्या २३ कसोटी आणि ३९ डावांत तो एकदाही तिहेरी अंक गाठू शकलेला नाही. यादरम्यान त्याची सरासरी २८.७८ इतकी राहिली आहे. पुजाराने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात ८८ चेंडू खेळून अवघ्या २६ धावा केल्या होत्या. मात्र, पुजारा आणि रहाणेला अजूनही कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात मोठी खेळी खेळण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून सुरेश रैना आहे जगातील सर्वात दिलदार व निस्वार्थी क्रिकेटर
क्रिकेटमध्ये ७ वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना, ज्यामुळे हेलावले होते संपूर्ण क्रिकेटजगत
‘बर्थडे बॉय’ सुरेश रैनाबद्दल ‘या’ खास १० गोष्टी माहित आहेत का?