कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या श्रीलंका आणि भारत यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्याचबरोबर, भारतीय संघाने २०२३ वनडे विश्वचषकासाठी खेळल्या जात असलेल्या आयसीसी पुरुष विश्वचषक सुपर लीगच्या पहिल्या पाच संघांमध्ये प्रवेश केला.
गुणतालिकेत झाला बदल
रविवारी (१८ जुलै) दोन वनडे सामने खेळले गेले. एक सामना श्रीलंका आणि भारत यांच्यात तर, दुसरा सामना झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या दोन सामन्यांच्या निकालानंतर आयसीसी पुरुष विश्वचषक सुपर लीग गुणतालिकेत अनेक बदल झाले. झिम्बाब्वेवरील विजयासह बांगलादेशने गुणतालिकेतील आपले दुसरे स्थान आणखी मजबूत केले आहे. तर, भारतीय संघाने पहिल्या पाच संघांमध्ये झेप घेतली.
यापूर्वी भारतीय संघ नवव्या क्रमांकावर होता. श्रीलंकेविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवल्याने भारताच्या खात्यात १० गुण जमा झाले. आता बांगलादेशच्या खात्यात ७० गुण आणि भारताच्या खात्यात ३९ गुण आहेत.
अशी आहे गुणांकन पद्धत
भारत या लीगमध्ये आत्तापर्यंत सात सामने खेळला असून, त्यापैकी त्यांनी चार जिंकले आहेत तर, उर्वरित तीनमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रत्येक संघाला विजयानंतर १० गुण मिळतात. सामन्याचा निकाल न लागल्यास किंवा सामना टाय झाल्यास दोन्ही संघांना पाच गुणांचे वाटप केले जाते. सामना गमावण्यासाठी एकही गुण दिला जात नाही. मात्र, षटकाची गती न राखल्यास गुण वजा केले जातात.
इंग्लंड १५ सामन्यांत ९ विजयांसह शीर्षस्थानी आहे. इंग्लंडच्या खात्यात एकूण ९५ गुण आहेत. इंग्लंड आणि बांगलादेश व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान अव्वल चारमध्ये कायम आहेत. या मालिकेचे उर्वरित दोन सामने भारताने जिंकले तर, ते तर तिसऱ्या स्थानावर पोहोचतील.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघासाठी खुशखबर! संपला रिषभ पंतचा क्वारंटाईन कालावधी, ‘या’ तारखेला जोडला जाणार संघासोबत
‘पहिल्या ५.३ षटकात आमचा जलवा होता’, शॉच्या खेळीनंतर सेहवागचे ‘त्या’ खास फोटोसह मजेदार ट्विट
“युवा खेळाडूंवर शतक करण्याचा दबाव टाकू नये”, माजी भारतीय क्रिकेटर गरजला