भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध लीसेस्टरशायर हा सराव सामना सुरू आहे. चार दिवसांचा हा सामना २३ जूनपासून सुरू असून लिसेस्टर काउंटी ग्राऊंडवर खेळला जात आहे. यानंतर भारत १ जुलैपासून एजबॅस्टन, बर्मिंघम येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. या महत्वाच्या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा कोरोनातून पूर्णपणे बरा झाला आहे. तो लवकरच भारतीय संघासोबत दिसणार आहे.
अश्विनने कसोटी सामन्यासाठी सराव सुरू केला आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने तो भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही. भारताचे खेळाडू १६ जूनला इंग्लंडला रवाना होणार होते तेव्हा तो मुंबईला पोहोचला होता. मात्र तो कोरोना पॉजिटिव्ह आल्याने त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. सध्या तो लिसेस्टर येथे उपस्थित असून सराव सामन्यात खेळणार की नाही हे निश्चित नाही.
भारतीय संघ रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली हा कसोटी सामना खेळणार आहे. कोरोनामुळे मागील वर्षी हा दौरा अर्धवट सोडून भारतीय संघ मायदेशी परतला होता. त्यावेळी भारत पाच पैकी चार कसोटी सामने खेळला. या मालिकेतील शेवटचा सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. या मालिकेत भारत २-१ असा पुढे आहे.
मालिका जिंकण्यासाठी भारताला शेवटचा सामना जिंकणे किंवा अनिर्णीत राखणे महत्वाचे आहे. भारताने ही मालिका जिंकली तर प्रथमच भारत इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचेल. एजबस्टन येथील भारताची कामगिरी पाहिली असता हे तेवढे सोपे वाटत नाही. या मैदानावर भारताने इंग्लंड विरुद्ध ७ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये यजमान संघाने ६ सामने जिंकले तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामने – ७
इंग्लंड – ६
भारत – ०
अनिर्णीत – १
या मालिकेत भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे आणि तेवढ्याच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. यामध्ये दुसरा भारतीय संघ १ आणि ३ जुलैला टी२०चा सराव सामना खेळणार आहेत. हे सामने डर्बी आणि नॉर्थम्पटन येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर ७, ९ आणि १० जुलैला तीन टी२० सामने आणि १२, १४ आणि १७ जुलैला तीन वनडे सामने खेळणार आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारताचा अंतिम अकरा जणांचा संघ खालील खेळाडूंमधून निवडला जाईल,
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चाहत्याच्या अचाट स्मरणशक्तीवर सचिनही प्रभावित, प्रत्येक कसोटी शतकाची डिटेल तोंडपाठ- Video
दोनाचे झाले तीन! मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटर बनला बाबा, पत्नीने गोंडस मुलीला दिला जन्म
विराटला आउट करण्यासाठी पाकिस्तानी दिग्गजाने रचली व्यूहरचना