इंग्लंड आणि भारत दरम्यान आजपासून (४ ऑगस्ट) ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार असून या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते इंग्लंडमध्ये आहेत. या काळात भारतीय संघाने इंग्लंडच्या मैदानावर कसून सराव केला आहे. त्यामुळे भारतीय संघात असे ४ खेळाडू आहेत, जे कसोटीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
रोहित शर्मा –
भारतीय संघाचा सलामीचा आणि विश्वासू फलंदाजांपैकी एक असलेला खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. रोहितने आतापर्यंत कसोटीमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. मागील काही काळापासून रोहित चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रोहितची मागील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरी पाहता यंदाच्या पर्वातही तो अशीच कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. रोहित हा विस्फोटक फलंदाज असल्याने तो इंग्लंड विरुद्ध चांगली खेळी करून भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका साकारू शकतो.
विराट कोहली –
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची मागील काही काळापासून अपेक्षित अशी कामगिरी दिसली नाही. असे असले तरी कोहली ‘रनमशीन’ म्हणून ओळखला जातो. तो कधीही त्याच्या कौशल्याने उत्तम कामगिरी करून भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचे काम करू शकतो. तसेच इंग्लंडविरुद्धची त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. तो इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारा सक्रिय फलंदाज आहे.
रिषभ पंत –
या यादीत भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतचा देखील समावेश आहे. पंतने गेल्या काही वर्षांपासून आपल्या फलंदाजीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच यष्टिरक्षणातही त्याने कमालीची सुधारणा केलेली दिसून येते. पंत सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पंतकडे त्याच्या फलंदाजीतील कौशल्याच्या जोरावर सामन्याचा निर्णय बदलण्याची क्षमता आहे. असेच काहीसे त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केले होते. त्याने आपल्या उत्कृष्ट खेळीने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. पंतकडून इंग्लंड दौऱ्यातही अशीच अपेक्षा केली जात आहे. म्हणून इंग्लंड दौऱ्यात सर्वांचे लक्ष पंतकडे लागून राहिल.
जसप्रीत बुमराह –
जसप्रीत बुमराह भारतीय संघातील महत्त्वाचा असा गोलंदाज आहे. त्याने आजपर्यंत त्याच्या भेदक गोलंदाजीने अनेक वेळा भारतीय संघाला गरजेच्या वेळी विकेट मिळवून दिली आहे. बुमराहकडे गती असल्यामुळे इंग्लंड सारख्या मैदानात बुमराहला त्याच्या गतीचा फायदा होऊ शकतो. तसेच इंग्लिश खेळाडूंना तो त्रासदायक ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
– आरंभ है प्रचंड! नॉटिंघम कसोटीत इंग्लंडला धोबीपछाड देण्यास विराटसेना सज्ज, बघा तयारीचा व्हिडिओ
– जडेजा किंवा अश्विनला बाकावर बसवत कोहली ‘या’ शिलेदारावर लावणार डाव, बघा कोण आहे तो?
– नेहमी सामन्यापूर्वीच प्लेइंग XI ची घोषणा करणारा कोहली यंदा शांत; म्हणाला, ‘संघाची घोषणा…’