भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) सिडनी येथे वनडे मालिकेने सुरुवात झाली. भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात ६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या या मोठ्या पराभवानंतर भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताचा माजी कर्णधार आणि सलामीवीर गौतम गंभीर यानेदेखील भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
२०१९ विश्वचषकातील चुकांची पुनरावृत्ती नको
एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गंभीरने भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीविषयी चर्चा केली. भारतीय संघाला एका अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता असल्याचे गंभीर याने स्पष्ट केले.
अष्टपैलूंविषयी बोलताना गंभीर म्हणाला, “आपण सध्या २०२३ विश्वचषकाचा विचार करत आहोत. आपल्याला एक सर्वोत्तम अंतिम ११ कोण आहेत? हे निवडावे लागेल. २०१९ विश्वचषकात जी चूक झाली ती पुन्हा होता कामा नाही. हार्दिक गोलंदाजी करणार नसेल, तर आपल्याला अजून एक पर्याय शोधावा लागणार आहे. आपल्याला असा एक खेळाडू हवा आहे, जो पहिल्या सहामध्ये फलंदाजी करेल आणि ७-८ षटके गोलंदाजीसुद्धा करू शकतो.”
वॉशिंग्टन सुंदरला द्यावी संधी
सहाव्या क्रमांकावर खेळणारा तो अष्टपैलू खेळाडू कोण असावा? या प्रश्नाचे उत्तर देताना गंभीर म्हणाला, “मला वाटते भारतीय संघाने वॉशिंग्टन सुंदरला नियमित संधी द्यायला हवी. माझ्या मते, केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात यावे. वॉशिंग्टन एक उत्कृष्ट फलंदाज आहे. तो सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर हार्दिक आणि जडेजासोबत फलंदाजी करू शकतो. तो पावर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासदेखील सक्षम आहे. एक अष्टपैलू वेगवान गोलंदाज असावा, याची गरज नाही. विजय शंकर तंदुरुस्त नसल्याने वॉशिंग्टनला खेळवणे फायद्याचे ठरेल.”
भारताला सहाव्या गोलंदाजाची कमतरता भासतेय- विराटने दिली होती कबुली
भारतीय संघाला सध्या अष्टपैलू खेळाडूंची कमतरता जाणवत आहे. भारताचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे गोलंदाजी करत नाही. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले होते की, ‘विराट काही काळ गोलंदाजी करू शकणार नाही. त्यामुळे आम्हाला सहाव्या गोलंदाजांची उणीव जाणवत आहे’.
पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघ प्रमुख चार गोलंदाज व अष्टपैलू रवींद्र जडेजा अशा पाच गोलंदाजांसह खेळला होता. या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघाने ३७४ धावांची मोठी धावसंख्या उभारलेली, ज्याचा यशस्वी पाठलाग भारतीय फलंदाज करू शकले नव्हते.
आयपीएलमध्ये वॉशिंग्टनने केली होती शानदार कामगिरी
गंभीर मागणी करत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरचा भारताच्या वनडे संघात समावेश नाही. तो फक्त टी२० सामन्यात भारतीय संघाचा सदस्य आहे. वॉशिंग्टनने भारतीय संघाकडून आत्तापर्यंत १ वनडे आणि २३ टी२० सामने खेळले आहेत. नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना त्याने उत्तम कामगिरी बजावली होती. यादरम्यान त्याने १५ सामने खेळताना ८ विकेट्सची कमाई केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचे वनडे मालिका विजयाचे स्वप्न भंगणार! या कारणामुळे दुसरा वनडे सामना होणार रद्द?
“पाकिस्तान संघ कोणता क्लब संघ नाही” शोएब अख्तर न्यूझीलंडवर कडाडला
समालोचन करताना गिलख्रिस्टकडून भारतीय खेळाडूबाबात मोठी चूक, चाहत्यांच्या रोषानंतर मागितली माफी
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके