भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 19 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे, पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चाहते या मालिकेच्या सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत आहेत, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे याचे सर्वात मोठे कारण आहेत. हे दोन्ही खेळाडू दीर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाने काही रोमांचक एकदिवसीय सामने पाहिले आहेत. दोन्ही संघांमधील द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेतील विक्रम लक्षात घेता, कांगारूंना थोडीशी आघाडी असल्याचे दिसते.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिली द्विपक्षीय एकदिवसीय मालिका 1984 मध्ये भारताने आयोजित केली होती. कांगारूंनी ही एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली. तेव्हापासून, दोन्ही संघांमध्ये एकूण 15 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आठ वेळा विजय मिळवला आहे.आणि भारताने सात वेळा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळली होती, पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा पराभव पत्करावा लागला होता. आतापर्यंत, भारताने ऑस्ट्रेलियात तीन द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत, ज्यामध्ये फक्त एकदाच विजय मिळवला आहे, 2019 मध्ये त्यांनी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली होती.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर वनडे सामन्यांमध्ये आजवर एकूण 54 सामने खेळले आहेत. यापैकी फक्त 14 सामने भारताने जिंकले आहेत, तर 38 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. उर्वरित 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.
अशा परिस्थितीत, भारतीय संघाचे लक्ष आता या परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यावर असेल. विशेषतः नवीन वनडे कर्णधार शुभमन गिलसाठी हे आव्हान निश्चितच मोठं असणार आहे.






