भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला उद्यापासून (१२ मार्च) सुरुवात होत आहे. हे सर्व सामने अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविले जातील. पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. मात्र, भारतीय संघासमोर योग्य संघ निवडीचे आव्हान असेल. आज आपण पहिल्या सामन्यासाठी भारताचा संभावित संघ कसा असेल, यावर नजर टाकूया.
१) रोहित शर्मा
भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा या सामन्यात खेळणे निश्चित आहे. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतही तो अप्रतिम फॉर्ममध्ये होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकल्यानंतर तो अनेक दिवसांनी भारताच्या निळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक चार शतके झळकावण्याचा मान रोहितकडे आहे.
२) केएल राहुल
रोहितचा साथीदार म्हणून कोणाला संधी द्यायची? हा मोठा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आहे. कारण, केएल राहुल व शिखर धवन हे दोन्ही अनुभवी सलामीवीर या जागेवर दावा करत आहेत. दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने कोणाला संधी द्यायची हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मात्र, संघ व्यवस्थापन राहुलला रोहितचा साथीदार म्हणून संधी देऊ शकते.
३) विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा तिसऱ्या स्थानी खेळेल. कसोटी मालिकेत म्हणावी तशी कामगिरी न झाल्याने टी२० मालिकेत अधिकाधिक धावा काढण्याचे लक्ष विराटने ठेवले असेल.
४) श्रेयस अय्यर
चौथ्या क्रमांकावर मुंबईकर श्रेयस अय्यरचे खेळणे देखील निश्चित आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये दोन दमदार शतके झळकावत त्याने आपण फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले होते. मागील काही काळापासून तो भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा चौथ्या क्रमांकाचा नियमित फलंदाज आहे.
५) सूर्यकुमार यादव
देशांतर्गत क्रिकेट व आयपीएल गाजवल्यानंतर मुंबईकर सूर्यकुमार यादव याला प्रथमच भारतीय संघात संधी मिळाली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या आक्रमक फटकेबाजीने त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. उद्याच्या सामन्यातून त्याला आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
६) रिषभ पंत
मागील काही काळापासून भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातून दूर असलेला यष्टीरक्षक रिषभ पंत उद्याच्या सामन्यात खेळताना दिसेल. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याचेच बक्षीस म्हणून त्याला पुन्हा टी२० संघात समाविष्ट केले गेले आहे. संघ व्यवस्थापनाने तो पहिल्या सामन्यात खेळेल, असे जाहीर केले होते.
७) हार्दिक पंड्या
भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या हादेखील उद्याच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. पंड्याने आपला अखेरचा सामना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील अखेरच्या टी२० सामन्यात खेळला होता. हार्दिक त्या मालिकेत मालिकावीर ठरलेला. दोन दिवसांपूर्वी हार्दिकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, आपण आगामी मालिकेसाठी सज्ज असल्याचे म्हटले होते.
८) शार्दुल ठाकूर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चमकदार कामगिरी करणारा मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर हादेखील पहिल्या सामन्यात खेळताना दिसू शकतो. टी नटराजन दुखापतग्रस्त असल्याने तो या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. शार्दुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत, भारताच्या विजयात हातभार लावला होता. तसेच, विजय हजारे ट्रॉफीच्या साखळी सामन्यांमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी केली होती.
९) अक्षर पटेल
गुजरातचा अक्षर पटेल उद्याच्या सामन्यातून बऱ्याच दिवसानंतर टी२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत तीन सामन्यांमध्ये मिळून त्याने तब्बल २८ बळी आपल्या नावे केले होते. त्यामुळे, वॉशिंग्टन सुंदरऐवजी त्याला संघ व्यवस्थापन संधी देऊ शकते.
१०) भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमार हादेखील या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. जवळपास दीड वर्षांनंतर तो भारतीय संघासाठी सामना खेळेल. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत त्याच्यावर गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असेल.
११) युजवेंद्र चहल
भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा सर्वोत्तम फिरकीपटू असलेला युजवेंद्र चहल या सामन्यात खेळणे नक्की आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी२० मालिकेनंतर तोदेखील प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारतीय खेळाडूंची तुलना पाकिस्तानी खेळाडूंसोबत करू शकत नाही, कारण पाकिस्तानकडे जास्त टॅलेंट आहे”
मायकेल वॉनने केलेल्या टीकेवर संतापला जोफ्रा आर्चर, तिखट प्रत्युतर देत म्हणाला..
दमदार शतकासह ‘या’ कॅरेबियन फलंदाजाने विराटला सोडले मागे, फिंचची केली बरोबरी