fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ!

साउथॅंप्टन| इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवार, 30 आॅगस्टपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना द रोज बॉल मैदानावर होणार आहे.

भारतीय संघ 5 सामन्यांच्या या कसोटीमालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला या चौथ्या सामन्यातून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे.

यामालिकेत भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात पराभव स्विकारला तर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले आहे.

या चौथ्या सामन्याआधी भारताच्या 18 जणांच्या संघातून अनुभवी सलामीवीर मुरली विजय आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला वगळण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी उर्वरित चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे.

त्यामुळे आता भारतीय संघ व्यवस्थापनाला 18 खेळाडूंमधून 11 जणांचा संघ निवडताना चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. परंतू तरीही संघव्यवस्थापन तिसऱ्या कसोटीतील संघच कायम ठेवण्याची शक्यता दाट आहे.

तिसऱ्या कसोटीत विराट कोहली(कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन,जसप्रित बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी असा संघ खेळला होता.

यात शिखर धवन आणि केएल राहुलने सलामीला फलंदाजी केली होती. चौथ्या सामन्यासाठीही हीच सलामीची जोडी कायम राहू शकते. ही जोडी या मालिकेत फक्त तिसऱ्या कसोटीत सलामीला खेळली होती.

तिसऱ्या कसोटीत या जोडीने दोन्ही डावात प्रत्येकी 60 धावांची सलामी भागिदारी केली होती. त्यांना पर्याय म्हणून युवा प्रतिभाशाली फलंदाज पृथ्वी शॉ आहे. परंतू भारतासाठी हा सामना महत्त्वाचा असल्याने ते अनुभवाच्या बाजूने विचार करण्याची शक्यता आहे.

तसेच मधल्या फळीसाठी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे कायम राहतील. पहिल्या दोन्ही कसोटीत अपयश आलेल्या रहाणेने तिसऱ्या कसोटीत दोन्ही डावात मिळून 110 धावा करत चांगली कामगिरी केली होती.

तर पुजारानेही दोन्ही डावात मिळून 86 धावा करत चौथ्या कसोटीसाठी जागा जवळजवळ पक्की केली आहे.

याबरोबरच यष्टीरक्षक म्हणून भारताकडे दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत असे दोन पर्याय आहेत. पण कार्तिकने संधी मिळालेल्या पहिल्या दोन्ही कसोटीत विशेष अशी कामगिरी केली नव्हती. त्याला या दोन सामन्यात मिळून फक्त 21 धावाच करता आल्या होत्या.

त्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्यात वगळून पंतला संधी देण्यात आली होती. या संधीचा योग्य फायदा घेत पंतनेही यष्टीमागे सर्वांना प्रभावित केले होते.

त्याने या सामन्यात यष्टीमागे 6 झेल घेतले होते. तसेच 25 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला चौथ्या कसोटीसाठी यष्टीरक्षक म्हणून पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे.

याबरोबरच अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्याच कायम राहिल हे जवळपास पक्के आहे. त्यानेही पहिल्या दोन कसोटीत आलेल्या अपयशानंतर तिसऱ्या कसोटीत त्याने 6 विकेट आणि दुसऱ्या डावात अर्धशतक करत सर्वांना गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात प्रभावित केले आहे.

गोलंदाजी फळीनेही तिनही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यांना दुसरा कसोटी सामना वगळता पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात दोन्ही डावात इंग्लंडला सर्वबाद करण्यात यश आले आहे.

त्यामुळे भारतीय संघ 1 फिरकी गोलंदाज आणि 3 पूर्णवेळ वेगवान गोलंदाज घेऊन पुढे जाईल. यात त्यांना ज्यादाचा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्याचा पर्याय असेल.

तसेच विराटनेही नेतृत्व करताना लागोपाठच्या दोन कसोटी सामन्यात संघात एकतरी बदल केला आहे. त्यामुळे कदाचीत शमीच्या ऐवजी उमेश यादवला 11 जणांच्या संघात संधी मिळू शकते.

शमीला तिसऱ्या कसोटीत विशेष काही करता आले नव्हते. तसेच त्याने तीन कसोटी मिळून 8 विकेट्स घेतल्या आहेत. तर उमेशला पहिल्याच कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. यात त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

याचबरोबर जसप्रीत बुमराहने दुखापतीनंतर दमदार पुनरागमन केले आहे आणि इशांत शर्मानेही चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे ते दोघेही चौथ्या सामन्यासाठी कायम राहतील.

त्याचबरोबर आर आश्विन जर फिट असेल तर त्यालाच फिरकी गोलंदाज म्हणून पहिली पसंती मिळेल. पण जर तो फिट नसेल तर रविंद्र जडेजाला संधी मिळेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: तब्बल ४८ वर्षांनंतर भारताला ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक

एशियन गेम्स: केवळ ०.२४ सेंकदाने हुकले सुवर्णपदक

एशियन गेम्स: टेबल टेनिस मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक

 

You might also like