नेपीयर। ऑस्ट्रेलिया दौरा यशस्वी संपल्यावर भारतीय संघ आता न्यूझीलंडमध्ये पोहचला आहे. या न्यूझीलंड दौऱ्यात 5 वन-डे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिका होणार आहे. तसेच हा दौरा मे महिन्यात होणाऱ्या आयसीसी विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात नेपीयर वनडेने 23 जानेवारी रोजी होणार आहे. तर वेलिंग्टनला 5वा वनडे सामना 3 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन-डे मालिकेत जरी भारताने विजय मिळवला असला तरी पाचव्या गोलंदाजाची भारताला गरज भासत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध फिरकीपटू युजवेंद्र चहलने उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे नेपीयर येथे होणाऱ्या पहिल्या वनडेत भारतीय संघ चहललाच कायम ठेवणार की कुलदिप यादवला परत संघात घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
नेपीयर वनडेसाठी या खेळाडूंना मिळू शकते अंतिम 11 जणांच्या संघात संधी –
सलामीवीर – रोहित शर्मा आणि शिखर धवन
भारतासाठी मागील काही वर्षात रोहित आणि शिखर यांनी सलामीला फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेची सुरुवात दमदार केली होती. त्याने सिडनी वनडेत शतकी खेळी केली होती.
धवननेही स्फोटक सुरूवात करून दिली होती. मात्र त्याला अधिक धावा करण्यात अपयश येत आहे. पंरतू या दोघांचा अनुभव पाहता हे दोघेच सलामीला फलंदाजी करणार असल्याचे जवळजवळ पक्के आहे.
मधली फळी – विराट कोहली, एमएस धोनी, दिनेश कार्तिक,
लक्ष्याचा पाठलाग करण्यात आघाडीवर असणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात शतकी खेळी केली आहे. तर संपूर्ण दौऱ्यात त्याची कामगिरी उत्तम आहे. पण तो भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज आहे. त्यामुळे त्याची कामगिरी या दौऱ्यात महत्त्वाची ठरणार आहे.
भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीने या वर्षाची सुरुवात चांगली केली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद 87 धावा केल्या होत्या. ज्यामुळे भारताला तो सामना आणि मालिका जिंकण्यात मदत झाली.
तसेच त्याने या तीनही सामन्यात अर्धशतकी खेळी करत भारताकडून सर्वाधिक 193 धावा केल्या आहेत. त्यामुळे नेपीयर वनडेत त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
याबरोबरच त्याची मधल्या फळीतील कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तसेच तो यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळणार आहे. यष्टीरक्षण करताना त्याची कामगिरी चांगली झाली आहे.
त्याचप्रमाणे कार्तिकने सिडनी वनडेत धोनी बाद झाल्यानंतर रोहितला चांगली साथ दिली होती. पण त्याला जास्त धावा करण्यात अपयश आले होते. तर एडलेड येथे झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात नाबाद 25 धावा करत धोनीसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. तो तळातल्या फलंदाजांच्या मदतीनेही भारतासाठी धावा उभारण्यात मोलाचा वाटा उचलू शकतो.
अष्टपैलू- केदार जाधव, रविंद्र जडेजा
केदार जाधवने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात धोनीला चांगली साथ देत नाबाद 61 धावांची खेळी केली होती. यामुळे त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वन-डेसाठी अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते.
भारताकडे अष्टपैलू म्हणून रविंद्र जडेजा हा चांगला पर्याय आहेत. तसेच तो तळातली फलंदाजीही सांभाळू शकतो. त्याचबरोबर त्याने सिडनी कसोटीत गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. भारताकडे अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने जडेजाची अष्टपैलू कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
गोलंदाज – भुवनेश्वर कुमार, विजय शंकर, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाजांनी सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यातही त्यांच्याकडून ही अपेक्षा असेल.
हार्दिक पंड्याऐवजी संघात आलेल्या विजयला पदार्पणाच्या सामन्यात विकेट मिळवण्यात अपयश आले असले तरी त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे फलंदाजी करण्याचेही कौशल्य आहे.
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर, शमी यांच्यावर असणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भुवनेश्वरने सर्वाधिक आठ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने सिडनी वनडेत चांगली सुरुवात केली होती. पण त्याला शेवटच्या षटकात धावांची गती ठेवता आली नाही.
शमीला तीन सामन्यात पाच विकेट्स घेता आल्या असल्या तरीही त्याच्या गोलंदाजीतील इकोनॉमी रेट चांगला होता.
फिरकीपटू युजवेंद्र चहलने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करताना 6 विकेट्स घेतल्या होत्या. कुलदीप यादवला या सामन्यात विश्रांती मिळाली तर चहलसाठी ही चांगली संधी ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–होय! धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक
–टीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर
–मरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे