विराट कोहलीने टीममेट्सबरोबरचा शेअर केलेला हा खास फोटो पाहुन तुम्हालाही येईल हसू!

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्हीही संघात आंतरराष्ट्रीय टी20 आणि वनडे मालिका पार पडल्या. यानंतर आता 21 फेब्रुवारीपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारत विरुद्ध न्यूझीलंड एकादश संघात तीन दिवसीय सराव सामना 14-16 फेब्रुवारी दरम्यान पार पडला. हा सामना अनिर्णित राहिला.

या सराव सामन्यापासून दूर असणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आज संघसहकाऱ्यांबरोबचा एक मजेदार फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विराटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दिसत आहेत. या फोटोत या तिन्ही खेळाडूंनी डोळ्यांचे आणि चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव दाखविले आहेत. या फोटोला कॅप्शन देत विराटने लिहिले की, “नवी पोस्ट सुंदर दोस्त.”

न्यूझीलंड एकादशविरुद्ध सराव सामन्यात भारताने पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 263 धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून हनुमा विहारीने 101 धावांची शतकी खेळी केली होती. तर चेतेश्वर पुजाराने 93 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. अन्य फलंदाजांना मात्र 20 धावांची धावसंख्याही पार करता आली नाही.

तसेच न्यूझीलंड एकादशच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.  भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 17 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह (18), उमेश यादव (49) आणि नवदीप सैनीने (58) धावा देत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने 46 धावा देत 1 विकेट घेतली. त्यामुळे न्यूझीलंड एकादशचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आला.

त्यांनतर दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी चागंली फलंदाजी करत 4 बाद 252 धावा केल्या. या डावात मयंक अगरवालने 81 धावांची, तर रिषभ पंतने 70 धावांची खेळी केली. तसेच शॉने 39 धावांची खेळी केली.

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ-

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा (तात्पूरता समावेश)

You might also like