भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी असा आहे न्यूझीलंड संघ; ट्रेंट बोल्टचे झाले पुनरागमन

21 फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 2 सामन्यांच्या कसोटी (2 Matches of Test Series) मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने यापूर्वीच आपला संघ जाहीर केला होता. यानंतर आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोमवारी (17 फेब्रुवारी) 13 सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे.

या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना न्यूझीलंड संघात संधी दिली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध कसोटी संघाची घोषणा करत आपल्या गोलंदाजी आणि अष्टपैलू क्रिकेटपटूंवर अधिक लक्ष दिले आहे.

या कसोटी मालिकेतून अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) न्यूझीलंड संघात पुनरागमन करेल. बोल्टला मागीलवर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो मालिकेच्या शेवटच्या सामन्यातून बाहेर पडला होता. परंतु आता तो पुनरागमन करत असल्याने न्यूझीलंड संघाची गोलंदाजी आणखी मजबूत होईल.

त्याचबरोबर भारताविरुद्ध वनडे मालिकेत चांगली कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनला (Kyle Jamieson) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्यालाही भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात संधी मिळाली आहे.

जेमिसनने न्यूझीलंड ‘अ’ आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्याने भारताविरुद्ध वनडे मालिकेत गोलंदाजीबरोबरच उत्कृष्ट फलंदाजीही केली आहे.

ट्रेंट बोल्ट व्यतिरिक्त न्यूझीलंडने आपल्या संघात फिरकीपटू अजाज पटेलला (Ajaj Patel) सामील केले आहे. तसेच टीम साऊथी (Tim Southee), नील वॅगनर (Neil Wagner) हे अनुभवी वेगवान गोलंदाजही न्यूझीलंड संघात आहेत.

फिरकीपटू मिशेल सँटनरला (Mitchell Santner) या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने संघात घेतलेले नाही. त्याचबरोबर सलामीवीर फलंदाज जीत रावल (Jeet Rawal) आणि वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीलाही (Matt Henry) कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात सामील केलेले नाही.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे 21 फेब्रुवारीपासून खेळण्यात येणार आहे.

कसोटी मालिकेसाठी असा आहे न्यूझीलंड संघ-

केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, हेन्री निकोलस, बीजे वॉटलिंग, कॉलिन डि ग्रँडहोम, टीम साऊथी, नील वॅगनर, ट्रेंट बोल्ट, अजाज पटेल, काईल जेमिसन, डेरिल मिशेल

कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा (तात्पूरता समावेश)

You might also like