न्यूझीलंड विरुद्ध सराव सामन्यात मयंक अगरवाल, रिषभ पंत चमकले

आज (16 फेब्रुवारी) सेडन पार्क येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड एकादश संघातील तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित ठरला. या सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाखेर 4 बाद 252 धावा केल्या. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांशी हातमिळवणी केली.

सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. या डावात भारताकडून सलामीला फलंदाजीला आलेला मयंक अगरवाल आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांनी 100 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली.

यावेळी अगरवालने 99 चेंडूत 81 धावा केल्या. यात 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर तो रिटार्यड आउट होऊन बाहेर पडला. तर, पंतने 65 चेंडूत 70 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

त्याचबरोबर युवा फलंदाज पृथ्वी शॉने 31 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत 39 धावा केल्या. मात्र शुबमन गिलला मोठ्या धावा करण्यात अपयश आले. त्याने 13 चेंडूत 1 चौकार मारत 8 धावा केल्या. 5व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या वृद्धिमान सहाने 5 चौकार मारत 38 चेंडूत 30 धावा केल्या. तर, 6व्या क्रमांकावर फलंदाजी करत आर अश्विनने 2 चौकार मारत 43 चेंडूत 16 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून डॅरियल मिशेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (शनिवारी) भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंड एकादशच्या पहिल्या डावात 17 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह (18), उमेश यादव (49) आणि नवदीप सैनीने (58) धावा देत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने 46 धावा देत 1 विकेट घेतली.

त्यामुळे न्यूझीलंड एकादशचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आला. या डावात न्यूझीलंडकडून हेन्री कूपरने 68 चेंडूत सर्वाधिक 40 धावा केल्या. यात 6 चौकारांचा समावेश होता.

त्याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 263 धावा केेल्या होत्या. या डावात भारताकडून हनुमा विहारीने 101 धावांची शतकी खेळी केली होती. तर चेतेश्वर पुजाराने 93 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. अन्य फलंदाजांना मात्र 20 धावांची धावसंख्याही पार करता आली नाही.

या डावात न्यूझीलंड एकादश संघाकडून कुग्लेइजेन आणि इश सोधीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर जॅक गिब्सनने 2 विकेट्स आणि जेम्स निशमने 1 विकेट घेतली.

You might also like