INDvsSA 2nd ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) केबेरहा येथे खेळला गेला. या सामन्यात यजमानांनी भारताचा 8 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह त्यांनी मालिकेत 1-1ने बरोबरी साधली. भारतीय अशात मालिकेतील तिसरा सामना खूपच रोमांचक होणार आहे. मात्र, त्याआधी दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार केएल राहुल याने मोठे विधान केले आहे. त्याने संघाकडून कुठे चूक झाली, ते सांगितले आहे.
काय म्हणाला राहुल?
सामन्यात 56 धावांची अर्धशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार केएल राहुल (KL Rahul Statement) याने पराभवानंतर मोठे भाष्य केले. तो म्हणाला, “या सामन्यात नाणेफेकीने मोठी भूमिका बजावली. पहिल्या डावात खेळपट्टीतून मदत मिळत होती आणि फलंदाजी करणे कठीण होत होते. त्यामुळे आमचा संघ चांगली धावसंख्या उभारू शकला नाही. एक वेळ होती, जेव्हा मी आणि साई सुदर्शन टिकलो होतो. त्यावेळी आमच्याकडे आमची खेळी शतकात बदलून संघाला चांगली धावसंख्या मिळवून देण्याची संधी होती. अशात आम्हाला आणखी 50-60 धावा मिळाल्या असत्या, ज्या डिफेंड करण्यासाठी पुरेशा ठरू शकल्या असत्या.”
‘सर्व खेळाडूंची आपली योजना असावी’
पुढे बोलताना राहुल (KL Rahul) म्हणाला की, “जर आम्ही कमीत कमी 240 धावसंख्येपर्यंत पोहोचलो असतो, तर सामन्याचा निकाल बदलू शकला असता. मात्र, दुर्दैवाने आम्ही एका काळानंतर सलग विकेट्स गमावल्या. सर्व खेळाडूंकडे आपली योजना नक्कीच असली पाहिजे. संघाची योजना वेगळी असते, पण सर्वांनी आपल्या गेम प्लॅनसोबत यावे आणि त्याच अंदाजात खेळावे, हे आम्हाला हवे असते. जेणेकरून त्यांना कुठलाही दबाव वाटणार नाही.”
भारताचा पराभव
भारतीय संघाने या सामन्यात साई सुदर्शन (62) आणि केएल राहुल (56) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 46.2 षटकात 10 विकेट्स गमावत 211 धावा केल्या. यावेळी यजमानांकडून नांद्रे बर्गर चमकला. त्याने 10 षटकात 30 धावा खर्चत 3 विकेट्स घेतल्या. यानंतर भारताच्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांनी 42.3 षटकात 2 विकेट्स गमावत 215 धावा केल्या. तसेच, सामना 8 विकेट्सने खिशात घातला.
अशात मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 21 डिसेंबर रोजी पार्लच्या बोलँड पार्क स्टेडिअममध्ये खेळला जाईल. या सामन्यात दोन्ही संघांच्या नजरा विजय मिळवून मालिका खिशात घालण्यावर असतील. (india vs south africa 2nd odi captain kl rahul statement why team loss know here)
हेही वाचा-
अरररर! ‘या’ संघाची झाली मोठी चूक, गोंधळ झाला अन् भलताच खेळाडू घेतला विकत
IND vs SA । दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा सोपा विजय, भारताच्या आठही गोलंदाजांची धुलाई