महिला टी२० वर्ल्डकप: पुनम यादवची कमाल; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला नमवत टीम इंडियाची विजयी सुरुवात

आज (21 फेब्रुवारी) सिडनी येथे भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील पहिला सामना पार पडला. हा सामना भारतीय महिला संघाने 17 धावांनी जिंकला असून स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 133 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला 19.5 षटकात सर्वबाद 115 धावाच करता आल्या.

यावेळी ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हेलीने 35 चेंडूत सर्वाधिक 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये 1 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे. तसेच ऍशले गार्डनरने 34 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता.  मात्र या दोघींव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या अन्य कोणत्याही खेळाडूला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

भारताकडून पुनम यादवने शानदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या मधली फळीला मोठे धक्के दिले होते. तिने 4 षटके गोलंदाजी करताना 19 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.  तिच्या व्यतिरिक्त भारताकडून शिखा पांडेनेही चांगली गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या. तसेच राजेश्वरी गायकवाडने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 बाद 132 धावा केल्या होत्या. यावेळी भारताची अष्टपैलू क्रिकेटपटू दीप्ती शर्माने 46 चेंडूत सर्वाधिक 49 धावा केल्या. यामध्ये 3 चौकाराचा समावेश आहे. तसेच भारताची 16 वर्षीय युवा फलंदाज शेफाली वर्माने 15 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. तर जेमिमाह रोड्रिगेजने 26 धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करता आली नाही.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना जेस जोनासनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर एलिसा पेरी आणि जेस जोनासनने प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या.

You might also like