fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वात पहिला षटकार ठोकणारे भारताचे ३ शिलेदार

Indian Cricket First Batsman to hit First Six Test ODI T20I Records

क्रिकेट नेहमीपासूनच फलंदाजांचा खेळ राहिला आहे आणि क्रिकेटच्या मैदानावर एक चाहता म्हणून प्रत्येकाला फलंदाजांची विस्फोटक खेळी पहायची असते. क्रिकेट इतिहासात अनेक खेळाडू होऊन गेले आहेत, ज्यांनी प्रत्येक क्रिकेट प्रकारात विस्फोटक शैलीत फलंदाजी करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजांने ठोकलेल्या चौकार आणि षटकाराचा आनंद प्रत्येक चाहत्याला लूटायचा असतो. मग ते कोणत्याही संघाला पाठिंबा देत असू. १९३२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघातही अनेक महान खेळाडू खेळले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास सर्व भारतीय खेळाडूंनीही अनेक चौकार आणि षटकार ठोकले आहेत.

तरीही असे म्हटले जाते, की जेव्हा कोणत्याही गोष्टीची पहिल्यांदा सुरुवात झाली आहे, तेव्हा ती इतिहासाच्या पानांमध्ये अविस्मरणीय गोष्ट म्हणून राहते. ही बाब लक्षात घेता या लेखात आपण भारताकडून खेळताना तिन्ही क्रिकेट प्रकारात सर्वात पहिला षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

भारताकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात षटकार ठोकणारे ३ खेळाडू- Indian Cricket First Batsman to hit First Six Test ODI T20I Records

१. कसोटी क्रिकेट- अमर सिंग

भारतीय संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू अमर सिंग (Amar Singh) यांनी २५ जून १९३२ साली इंग्लंडविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. विशेष म्हणजे तो भारतीय संघाचा पहिलाच कसोटी सामना होता. तो सामना इंग्लंडने १५८ धावांनी जिंकला होता.

अमर यांंनी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९३२ ते १९३६ यादरम्यान खेळताना केवळ ७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी २२.४६ च्या सरासरीने एकूण २९२ धावा केल्या आहेत. त्यांची सर्वाधिक धावसंख्या ही ५१ आहे. याव्यतिरिक्त उजव्या हाताने गोलंदाजी करताना अमर यांनी एकूण २८ विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांंनी ५१ धावांची खेळी केली होती. त्यादरम्यान त्यांनी एक षटकार ठोकला होता, जो कोणत्याही भारतीय फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलेला पहिला वाहिला षटकार होता. तसेच त्यांची अर्धशतकी खेळीदेखील कोणत्याही भारतीय फलंदाजांने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेली पहिलीच खेळी होती.

२. वनडे क्रिकेट- सुनिल गावसकर

भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी १३ जुलै १९७४ साली हेडिंग्ले येथे खेळण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. त्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडने ४ विकेट्सने पराभूत केले होते.

त्या सामन्यात नाणेफेकीत पराभूत होऊन प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सलामीवीर फलंदाज म्हणून गावसकरांनी २८ धावांची खेळी केली होती. त्यात त्यांनी १ षटकारदेखील ठोकला होता, जो कोणत्याही भारतीय फलंदाजाने आंतरराष्ट्रीय स्तरावर वनडे क्रिकेटमध्ये ठोकलेला पहिलाच षटकार होता.

३. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट- विरेंद्र सेहवाग

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) नेतृत्वात भारतीय संघाने १ डिसेंबर, २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ६ विकेट्सने पराभूत करत मालिकेवर आपले नाव कोरले होते.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १२६ धावा केल्या होत्या. त्यावेळी भारताने हे आव्हान १ चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केले होते. त्यादरम्यान भारताकडून सलामीला फलंदाजी करताना सेहवागने २९ चेंडूत ३४ धावा केल्या होत्या. त्यात त्याने १ षटकारही ठोकला होता. याबरोबरच सेहवाग आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात पहिला षटकार ठोकणारा पहिलाच खेळाडू बनला होता.

वाचनीय लेख-

-जगातील ५ असे महान क्रिकेटर, जे कधीही विश्वचषकात खेळले नाहीत

-विश्वचषकात खेळलेल्या ११ महान खेळाडूंचा संघ, दोन नावे आहेत भारतीय

You might also like