भारताचा फुटबॉलमध्ये जगात कितवा क्रमांक आहे असं विचारलं तर ९९% लोकांना डोकं खाजवावं लागेल. यावरून भारतात फुटबॉल किती लोकप्रिय आहे याची कल्पना येईल. क्रिकेटवेड्या या देशात इतर खेळांना व्यासपीठ मिळूनही लोकप्रियता मात्र मिळाली नाही. फुटबॉल सारखे खेळ कोलकाता, केरळ, गोवा, नॉर्थ ईस्ट, कोल्हापूर या भागांपुरतेच लोकप्रिय राहिले.
आता मात्र परिस्थिती बदलतेय. क्रिकेटवेड्या या देशात फुटबॉल आपले स्थान निर्माण करण्यात यशश्वी होतोय. याची अनेक उदाहरणे आपल्याला मागील १ ते २ वर्षात दिसली. याची खरी प्रचिती आली मागील वर्षी झालेल्या १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषकात ज्याचे आयोजन भारताने केले होते. या विश्वचषकात सर्व देशांच्या सामान्यांना प्रचंड प्रमाणात उपस्थिती लावत भारतीय प्रेक्षकांनी मैदानावरील उपस्थितीचे सर्व विक्रम मोडीत काढले. या स्पर्धेत तब्बल १३ लाख ४७ हजार १३३ प्रेक्षकांनी सामने मैदानावर पाहिले. ही संख्या फिफाच्या कोणत्याही २० वर्षाखालील विश्वचषकाची सर्वोच्च उपस्थिती आहे.
परंतु यानंतर भारतात होणाऱ्या आंतरखंडीय स्पर्धेकडे प्रेक्षकांनी तोंड फिरवले. पहिला सामना पाहायला जेमतेम २,५६९ प्रेक्षकांनी उपस्थिती नोंदवली. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने एका व्हिडिओद्वारे फुटबॉलचे सामने पाहायचे आवाहन केले. त्यानंतरचे सर्व सामने तर हाऊसफुल झालेच पण या व्हिडिओने भारतीय फुटबॉलला एक वेगळी कलाटणी दिली असे म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांचा पाठिंबा आणि भारतीय संघाच्या प्रदर्शनाच्या जोरावर भारताने आंतरखंडीय चषकच्या अंतिम सामन्यात केनियाला २–० ने मात देत चषकावर कब्जा केला.
युरोपमध्ये फुटबॉल प्रसिद्ध असण्याचे प्रमुख कारण आहे तिथे चालणाऱ्या त्यांच्या लीग. तसाच प्रयत्न १९९६ साली भारतात केला गेला नॅशनल फुटबॉल लीगच्या रूपाने. पण स्टेडियममध्ये पुरेश्या सुविधा नसल्याने या लीगला पुरेशी प्रसिद्धी मिळाली नाही. नॅशनल फुटबॉल लीगच्या २००६–०७ च्या हंगामानंतर ऑल इंडिया फुटबॉल फेडेरेशनने २००७–०८ पासून या लीगला नवे नाव आणि स्वरूप द्यायचे ठरवले आणि आय लीगची घोषणा केली. यात आधीच्या ८ आणि २ नवीन अश्या एकूण १० संघांचा समावेश करण्यात आला. २००७ ते २०११ पर्यंत आय–लीग च्या विजेत्याला आशियाई चॅम्पियन्स लीगच्या (एएफसी) पात्रता फेरीत खेळण्यास थेट प्रवेश मिळत होता. २०११ ते २०१३ पर्यंत कोणताही संघ एएफसीच्या नियमावलीत बसला नाही. आजपर्यंत आय–लीगचा कोणताही विजेता संघ एएफसीची पात्रता फेरी पार करू शकला नाही.
आय–लीग मधूनच भारतीय फुटबॉलला भायचुंग भुतिया, सुनील छेत्री, जेजे, सी के विनीत सारखे अनेक स्टार मिळाले आहेत. सुनील छेत्री हा आय–लीग मधून बाहेरच्या देशात जाणारा पहिला खेळाडू ठरला. त्याला अमेरिकेतील मेजर लीग सॉकरमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आय–लीग हे एक प्रमुख कारण आहे ज्याने भारतीय फुटबॉलला एक व्यावसायिक रूप दिले आणि भारतीय फुटबॉलला काही प्रमाणात चाहते लाभले.
९ डिसेंबर २०१० रोजी रिलायंस ग्रुपने ऑल इंडिया फुटबाॅल फेडरेशन सोबत १५ वर्षांसाठी तब्बल ७०० कोटीचा करार केला. ज्यात अनेक प्रकारच्या हक्कांबरोबरच स्वतःची एक फुटबाॅल लीग चालू करण्याचा सुद्धा करार होता.
२०१३ मध्ये मेजर लीग सॉकर सारखीच एक लीग भारतात चालू करायचे ठरले आणि इंडियन सुपर लीगची (आयएसएल) घोषणा करण्यात आली. आयपीएलप्रमाणेच आयएसएलच्या सर्व संघांचे मालक स्टार क्रिकेटपटू, अभिनेते, उद्योगपती असल्याने लीगला कमी वेळात खूप प्रसिद्धी लाभली. २०१४ पासून ही लीग भारतात चालू झाली. सुरुवातीला आशियाई फुटबॉल संघराज्याकडून अधिकृत मान्यता नसल्याने एकूण ८ संघ यात समाविष्ट करण्यात आले होते. ज्यात १ कोलकाताचा संघ युरोपच्या ला लीगामधील एटलेटिको मॅड्रिडने घेतला.
आयएसएलच्या प्रक्षेपणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सने २०१४ साली विकत घेतले. १२ ऑक्टोबर २०१४ ला आयएसएलचा पहिला सामना एटलेटिको मॅड्रिड आणि मुंबई सिटी एफसीमध्ये खेळाला गेला जो तब्बल ७ कोटी लोकांनी पहिला. तर पहिल्या आठवड्यात १७ कोटी प्रेक्षकांनी आयएसएलचे सामने पहिले. हा आकडा फिफा विश्वचषकाच्या १२ पटीने जास्त होता. आयएसएलचा पहिला मोसम ४२ कोटी ९० लाख लोकांनी पहिला जो फिफा विश्वचषकापेक्षा अडीच पटीने जास्त होता.
२०१७–१८ च्या हंगामाआधी लीगला एएफसी तर्फे मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर लीगमध्ये २ अजून संघांचा समावेश करण्यात आला. या मान्यतेबरोबरच आयएसएलच्या विजेत्याला एएफसी चषकात खेळण्याची संधीसुद्धा मान्य झाली. तसेच एएफसीच्या चॅम्पियन्स लीगमधील आय–लीगचे स्थान तसेच ठेवण्यात आले. फेडेरेशन चषक जिंकून बंगलोर २०१८ साली एएफसी चषक खेळणारा पहिला आयएसएलचा संघ ठरला. तर आयएसएलच्या अंतिम सामन्यात बंगलोरचा पराभव करत चेन्नईयन एफसी आयएसएल मधून एएफसी साठी पात्र ठरलेला पहिला संघ ठरला.
२०१४ साली हिरो मोटोकाॅर्पने आयएसएलबरोबर ३ वर्षाचा करार केला. तीन वर्षांसाठी केलेला हा करार २०१७ साली पुन्हा ३ वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. येत्या ३ वर्षात लीगवर १८३ कोटी खर्च करण्याची तयारी असल्याचे लीगच्या सर्वेसर्वा नीता अंबानी यांनी सांगितले.
आयएसएल लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण त्याची प्रसिद्धी. खेळाडूसुद्धा आयएसएलला अधिक महत्व देताना दिसून येत आहे. आय–लीगमध्ये खेळाडूंना त्याची ठरलेली कराराची रक्कमसुद्धा वेळेत मिळत नाही आणि ती रक्कम आयएसएलल्या तुलनेने खुप कमीसुद्धा आहे. या वर्षी झालेल्या आयएसएलच्या लिलावातील बंगलुरु एफसीने मिकू या खेळाडूला तब्बल ३.१७ कोटी एवढी रक्कम देऊन संघात घेतले. तर लिव्हरपूल आणि टॉटेनहॅम हॉट्स्पर्सतर्फे खेळलेल्या रॉबी केणेला एटलेटिको मॅड्रिडने २.५ कोटी एवढी रक्कम मोजली.
भविष्यातील फुटबॉल खेळाडू घडवण्याकरिता रिलायंस ग्रुपने भारताच्या विविध भागातून १०० मुले दत्तक घेतली असून त्यांना आता नवी मुंबईला प्रशिक्षण देण्यात येते. आयएसएलची लोकप्रियता आणि त्यातील खेळाडूंची कामगिरी तसेच भारतीय संघाच्या १६, १७ आणि २० वर्षाखालील संघाची कामिगिरी पाहता येत्या काही वर्षात भारतातुनसुद्धा युरोपमध्ये खेळाडू खेळतील आणि आयएसएल तसेच भारतीय संघाच्या सामन्यांना प्रेक्षकांची उपस्थिती पाहता काही वर्षात अजून एकदा फिफा विश्वचषक भारतात पाहायला मिळू शकतो.
भारतीय फुटबॉलचा चढता आलेख
By Akash Jagtap
On: मंगळवार, नोव्हेंबर 20, 2018 6:38 PM
---Advertisement---








