भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याचबरोबर या सुवर्ण पदकासह भारताची मोहीम देखील संपवली आहे. ऑलिम्पिकमध्ये भालाफेक या खेळात वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा नीरज हा देशातील पहिलाच खेळाडू आहे. तसेच ऑलिम्पिकच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखाद्या भारतीय खेळाडूने वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. नीरजच्या आधी अभिनव बिंद्राने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत ही कामगिरी केली होती.
परंतु तुम्हाला माहिती आहे का, नीरजच्या टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकापर्यंतच्या प्रवासाला सरकारच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किमसोबत (TOPS), त्यांचे खाजगी प्रायोजक जेएसडब्ल्यूने देखील हातभार लावला आहे. नीरजचे प्रशिक्षण आणि ऑलिम्पिकच्या तयारीवर भारत सरकारने किती गुंतवणूक केली आहे? ते जाणून घेऊया.
२०१६ मध्ये २० वर्षांखालील विश्वविक्रम मोडला
सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने २०१६ च्या २० वर्षांखालील आयएएएफ विश्व चॅम्पियनशिपमध्ये विश्वविक्रम मोडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या स्पर्धेत त्याने २० वर्षाखालील भालाफेक खेळात ८६.४८ मीटरपर्यंत भाला फेकण्याचा नवा विश्वविक्रम केला होता. त्याची ही फेक त्याचवर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्यासाठी पुरेसी होती. परंतु तोपर्यंत रिओ ऑलिम्पिकसाठीची पात्रता मुदत संपली होती. यामुळे नीरजला त्याच्या पहिल्या ऑलिम्पिक पदकासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागली.
या पाच वर्षांत केंद्र सरकारने त्याच्या प्रशिक्षण आणि ऑलिम्पिकच्या तयारीसाठी टॉप्स योजनेअंतर्गत खर्च केला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) च्या मते, केंद्र सरकारने टोकियो ऑलिम्पिकच्या आधी नीरजची तयारी आणि परदेशात त्याचे प्रशिक्षण व स्पर्धेत भाग घेण्यासाठी ४५० दिवसात ४.८५ कोटी रुपये खर्च केले आहेत. यादरम्यान नीरजने २६ स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्याने दक्षिण आफ्रिका, पोलंड, तुर्की, फिनलँड, झेक प्रजासत्ताक आणि स्वीडन येथे प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतला होता.
टोकियो ऑलिम्पिकच्या काही दिवस अगोदर नीरजने त्याच्या तयारीचा भाग म्हणून युरोपियन स्पर्धेतही सहभाग नोंदवला होता. त्यासाठी स्वीडनमध्ये ५० दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेले होते. त्याच्या प्रशिक्षण शिबिरावर सरकारने १९ लाख २२ हजार रुपये खर्च केले होते.
नीरजच्या प्रशिक्षकांना आतापर्यंत दिलेत १ कोटी २२ लाख
नीरजसाठी ऑक्टोबर २०१७ मध्ये भालाफेक दिग्गज उवे होन यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु मे २०१९ मध्ये नीरजच्या कोपर दुखापतीनंतर विद्यमान प्रशिक्षक डॉ. क्लाऊस बर्टोनिख यांची निवड झाली. केंद्र सरकारच्या मते, आतापर्यंत बर्टोनिखला पगार म्हणून १ कोटी २२ लाख रुपये दिले आहेत. त्याचबरोबर एसएआयनुसार, नीरजसाठी आतापर्यंत चार भाले खरेदी करण्यात आले आहेत, ज्याची किंमत ४ लाख ३५,००० रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ कारणामुळे नीरजच्या डाएटमध्ये आहे चक्क पाणीपुरीचा समावेश, वाचा सविस्तर
टोकियो वारी संपवून घरी परतल्यानंतर मिळाले बहिणीच्या निधनाचे वृत्त, ढसाढसा रडली ‘ही’ भारतीय ऍथलिट