कोव्हिड-19 या साथीच्या आजारामुळे मिळालेल्या विश्रांतीनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने अगदी योग्य वेळी प्रशिक्षण सुरू केले आहे. पुढच्या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघ मजबूत स्थितीत असेल, असा विश्वास वरिष्ठ डिफेंडर कोठजीत सिंग याने व्यक्त केला.
कोव्हिड-19 या साथीच्या रोगामुळे मिळालेल्या 45 दिवसांच्या विश्रांतीनंतर ऑगस्टमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात (साई) पुरुष आणि महिला हॉकी संघांचे राष्ट्रीय शिबिर पुन्हा सुरू आहे.
मैदानावर परत येऊन झाला आनंद
200 पेक्षा अधिक सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा कोठजीत सिंग म्हणाला की,“मैदानावर परत येऊन खूप आनंद झाला. गेल्या दोन महिन्यांत आम्ही आमच्यात झालेली सुधारणा पाहिली आहे. आम्ही ऑलिम्पिकसाठी चांगली तयारी करीत आहोत.”
फॉर्ममध्ये परतण्यासाठी आहे अधिक वेळ
“आम्ही योग्य वेळी मैदानावर परतलो आहोत. त्यामुळे आमच्याकडे आमच्या फॉर्ममध्ये परत येण्यासाठी आणि एक संघ म्हणून आणखी चांगले काम करण्यासाठी पुरेसा वेळ आहे.” असेही पुढे बोलताना तो म्हणाला
ऑलिम्पिक पात्रता गमावल्यानंतर या वर्षाच्या सुरूवातीला एफआयएच प्रो लीगमध्ये राष्ट्रीय संघात पुनरागमन केल्यामुळे, कोठाजीतला संघाबाहेर राहण्याच्या वेदना चांगल्या प्रकारे समजल्या. तो येत्या काही महिन्यांत संघात आपले स्थान मजबूत करण्यास उत्सुक आहे.
संघात स्थान मिळवण्यासाठी करेन मेहनत
कामगिरीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “संघाबाहेर असणे खूप अवघड बाब आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत करेन असा निश्चय मी केला आहे. मी माझ्या खेळात कुठे सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करेन. पुढील काही महिने आम्हा सर्वांसाठी आणि महत्वाचे आहेत.ऑलम्पिक स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे आम्हाला स्वतःच्या कामगिरीत आणि संघाच्या कामगिरीत अधिक सुधारणा करता येईल.”