-शारंग ढोमसे (Twitter- ranga_ssd)
इराणच्या महिला संघाचा आनंद गगनात मावत नव्हता, इराणचे पुरुष संघातील खेळाडूही त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी थेट मैदानात उतरले होते आणि दुसरीकडे होते हताश,निराश चेहरे. घडले होते त्यावर विश्वासच बसत नाही हे भाव भारतीय महिला खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. महिला संघाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या पुरुष संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. कर्णधार अजय ठाकूरला तर अश्रू अनावर झाले होते.
आदल्या दिवशी झालेल्या आपल्या पराभवाचा वचपा आपला महिला संघ काढेल ही अपेक्षा फोल ठरली होती. अजयचे अश्रू जणू सर्व भारतीय कबड्डी रसिकांच्या भावनांचं प्रतिनिधीत्व करत होते. १८ व्या आशियायी स्पर्धेतील महिला कबड्डी गटातील अंतिम सामन्यानंतरचे हे दृश्य होते. २०१० साली आशियायी स्पर्धेत महिला कबड्डीचा समावेश झाल्यापासून पहिल्यांदाच आपला महिला संघ पराभूत झाला होता. या सामन्याच्या आदल्या दिवशीच २८ वर्षे अजिंक्य असलेल्या भारतीय पुरुष संघाला पराभवाचा धक्का देत इराणने आपले सुवर्णपदकाचे स्वप्न धुळीत मिळवले होते. आजवर जे ‘दुहेरी सुवर्णपदक’ अगदी ग्राह्य धरले जात होते ते भारतापासून हिरावले गेलेले होते! ‘चक दे इंडिया’ चित्रपटातील कोच कबीर खानचे ते वाक्य आठवल्याशिवाय राहत नाही..”इस हार का बोझ कितना भारी है, ये शायद तुम समझ नही सकोगे..” भारतीय संघांच्या प्रत्येक खेळाडूच्या मनात या पराभवाचे शल्य आयुष्यभर राहील यात तिळमात्र शंका नाही.
भारतीय कबड्डी साठी हे पराभव आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखीत करतात. या पराभवाची कारणीमीमांसा करणे म्हणूनच अत्यंत गरजेचे ठरते ..
सदोष संघ निवड:
भारतीय संघ आशियाई स्पर्धेसाठी रवाना होत असताना भारतीय कबड्डी वर्तुळात प्रचंड खळबळ चालू होती. भारतीय संघात निवड होण्यासाठी पैशांची मागणी, वशिलेबाजी या सारखे गंभीर आरोप करणारी एक याचिका माजी कब्बड्डीपटू महिपाल सिंग व त्यांच्या काही सहकार्यांनी न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेत खरोखर तथ्य असू शकते याचा अंदाज संघ जाहीर झाल्यानंतर लागलीच आला. पुरुष व महिला दोनीही संघांत काही अनपेक्षित निवडी करण्यात आल्या.
पुरुष संघ:
१.आशियाई स्पर्धेपूर्वीच ‘कबड्डी मास्टर्स’ नावाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली. भारताने ही स्पर्धा अगदी सहज जिंकली होती. या स्पर्धेत भारताने इराणलाही नमवले होते(अर्थात या स्पर्धेत इराणने आपल्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती). त्यामुळे त्या स्पर्धेतील संघच जकार्ताला जाईल असे अपेक्षित होते. मात्र त्यात तीन अगदी अनाकलनीय असे बदल करण्यात आले. संघाचे प्रमुख आणि अनुभवी खेळाडू सुरिंदर नाडा, मनजीत चिल्लर आणि सुरजीत सिंग यांना वगळण्यात आले.
२.४ वर्षातून एकदाच येणाऱ्या कबड्डीच्या सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अगदी ३ महिने आधी निवड समितीला साक्षात्कार झाला असावा आणि त्यांनी राजू लाल चौधरी आणि गंगाधारी मल्लेश नावाचे हिरे शोधून काढले (अर्थात संघ निवड करण्यासाठी निवड समितीला किती स्वायत्तता दिली जाते हाही एक प्रश्नच आहे म्हणा). या आधी हे हिरे कोणत्या खाणीत लपले होते हे आता निवड समितीलाच माहिती.
महिला संघ:
१.निवड समितीची राजस्थानकडे असेलेली ओढ स्पष्टपणे दिसून आली (जनार्दन गेहलोत यांचे चिरंजीव हे राजस्थान कबड्डी संघटनेचे अध्यक्ष हे इथे नमूद करावेसे वाटते). राष्ट्रीय स्पर्धेत कुठलीही चमकदार कामगिरी न करणाऱ्या राजस्थान संघातील २ खेळाडूंची संघात वर्णी लागली. बरं त्यांची वैयक्तीक कामगीरी अगदी उल्लेखनीय होती अशातलाही प्रकार नाही. शालिनी पाठक,उषा राणी या खळाडूंना तर बहुदा फक्त सहल म्हणून संघाबरोबर नेण्यात आले असावे कारण त्यांना खेळवून भारताची हाराकिरी करून घेण्यासाठी आपण इथे आलो नाही आहोत याची कल्पना बहुधा प्रशिक्षकांना असावी.
२.हिमाचल प्रदेशच्या संघाने राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवले होते, फेडेरेशन कप स्पर्धेतही त्यांची कामगिरी सुरेख होती. त्यामुळे त्या संघांतील खेळाडूंचा संघात समावेश होणे अगदी स्वाभाविक होते. मात्र तिथेही हिमाचलच्या विजयाच्या खऱ्या शिल्पकारांना दूर ठेवण्यात आले आणि प्रियांका आणि कविताची निवड करण्यात आली, ज्यांचा हिमाचलच्या विजयात फारसा मोठा वाटा नव्हता. ‘किसकी टोपी किसके सर’ यातला हा प्रकार.
संघातील असमतोल :
महिला संघाच्या बाबतीत जरी ही गोष्ट लागू होत नसली तरी पुरुषांच्या संघात मात्र ही गोष्ट प्रामुख्याने जाणवली. संघात १२ पैकी केवळ ३ च खेळाडू हे ‘बचावपटू” होते (खरे तर २ च कारण राजू लाल चौधरी असून नसल्यासारखाच होता). खरी कमतरता जाणवली ती मध्यरक्षणात. संदीप आणि दीपक या दोघांनीही अनुक्रमे उजव्या आणि डाव्या मध्यरक्षकाची भूमिका पार पाडली मात्र या दोघांनाही या जागांवर खेळण्याचा फारसा अनुभव नाही. प्रो कबड्डीत आणि आपल्या राज्याच्या संघातूनही हे खेळाडू या जागांवर खेळत नाहीत मग त्यांना चक्क भारतीय संघात या जागांवर खेळवणे कितपत योग्य होते? जगातले २ सर्वोत्तम मध्यरक्षक भारताकडे असताना(सुरजीत आणि मनजीत) त्यांना संघाबाहेर ठेवण्याचे प्रयोजन कळू शकले नाही. संघात ७ चढाईपटूंचा समावेश करण्यात आला होता. हे ७ ही चढाईपटू प्रतिभावंतच आहेत यात शंका नाही मात्र एखादा चढाईपटू कमी करून सुरजित किंवा मनजीतचा समावेश करणे अधिक फायदेशीर ठरले असते.
अनुभवाची कमतरता:
प्रो कबड्डीत किंवा राष्ट्रीय स्पर्धेत खेळणे आणि आशियाई स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळणे यात जमीन आस्मानाचा फरक आहे. आशियाई स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळतांना प्रचंड दडपण असते त्यामुळे मोक्याच्या क्षणी सामन्यावर नियंत्रण मिळवून देणाऱ्या आणि संघांचे संचलन करणाऱ्या अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश असणे अत्यंत गरजेचे असते. नेमकी हीच बाबा भारतीय संघाना भोवली.
पुरुष संघ:
अजय ठाकूर सोडल्यास कोणालाही आशियाई स्पर्धेत खेळण्याचा अनुभव नव्हता. परिणामी,जेव्हा अंतिम सामना भारताच्या हातातून निसटत होता आणि दुखापतीमुळे अजयलाही बाहेर बसावे लागले तेव्हा संघ हतबल झाल्याचे चित्र दिसून आले. या उलट इराणच्या संघात फझल अत्राचली,अबोलफझल मगसोदलू,हादी ओश्तोरॉक,इ.अनुभवी खेळाडूंचा भरणा होता
महिला संघ:
पुरुषांच्या पराभवांनंतर महिला संघ आधीच मानसिक दडपणाखाली आला होता त्यामुळे इराणच्या संघाने आघाडी घेतल्यानंतर तुलनेने अनुनभवी असलेला आपला संघ अधिकच दडपणाखाली आला आणि गोंधळला. कर्णधार पायल चौधरीच्याही एका पाठोपाठ ३ पकडी झाल्या.अशा वेळी डोकं शांत ठेवून सामन्यावर पुन्हा नियंत्रण मिळवू शकणारे संघात कोणीही नव्हते. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा फारच कमी होतात त्यामुळे कविता देवीचा अपवाद वगळल्यास इतर कोणत्याही खेळाडूला या पूर्वी इराणच्या संघाविरुद्ध तसेच आशियाई स्पर्धेत खेळण्याचा अनुभव नव्हता. अभिलाषा म्हात्रे, प्रियांका हे अनुभवी खेळाडू संघात असते तर कदाचित सामन्याचे चित्र पालटू शकले असते.
चढाईपटूंचे अपयश :
भारतीय चढाईपटूंना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी संपूर्ण स्पर्धेत करता आली नाही. चढाईपटूना स्पर्धेच्या सुरवातीपासूनच सूर गवसलाच नाही. श्रीलंकेसारखा नवखा संघ आपल्या चढाईपटूंची ‘अव्वल पकड'(सुपर टेकल्स) करत होता तेव्हाच खरेतर धोक्याची घंटा वाजली होती. थायलंडच्या संघानेही भारतावर लोन चढवले, तेव्हाच ‘पर्शियन प्रहार’ झेलणे आपल्याला अवघड जाणार याची चाहूल आली होती. कदाचित चढाईपटूंचा अतिआत्मविश्वास आणि समोरच्या संघाला ग्राह्य धरणे त्यांना नडले. ‘पटना पायरेट्स’ कडून खेळणारा परदीप नरवाल आणि भारतीय संघाकडून खेळणारा परदीप नरवाल यात प्रचंड तफावत जाणवते. प्रो कबड्डीत एकाच चढाईत संपूर्ण संघ साफ करणारा परदीप आंतरराष्ट्रीय स्तरावर एक एक गुण घेण्यासाठी झगडताना दिसतो. भारतीय संघाच्या पराभवाला कारणीभूत घटकांमधील सर्वात महत्वाचा घटक चढाईपटूंचे अपयश आहे असे वाटते. कारण चढाईपटूनी अवसान घातकी खेळ केला नसता तरी प्राप्त परिस्थितीतही आपला संघ सुवर्णपदक मिळवू शकला असता.
पंचानी हिरावले महिला संघाचे सुवर्ण पदक:
अंतिम सामन्यात पंचांच्या चुकीच्या निर्णयांचा फटका संघाला बसला. भारतीय संघाच्या पराभवाचे जितके श्रेय इराण संघाला जायला हवे तितकेच ते जायला हवे पंचांना. एक नाही दोन नाही तर तब्बल ६ ते ८ गुणांचा फटका भारताला यामुळे बसला.
पंचाच्या चुका:
१.इराणची चढाईपटू घझल खलाज हिने चढाई करताना कबड्डी बोलणे थांबवून सुद्धा पंचानी तिला बाद ठरवले नाही. भारतीय पाल्यात तेव्हा केवळ ३ खेळाडू होते त्यामुळे त्या ठिकाणी भारताला अव्वल पकडीचे २ गुण मिळाले असते(२ गुण), शिवाय त्याच चढाईत घझलने साक्षीला बाद केले(१ गुण) परिणामी भारतीय पाल्यात केवळ २ खेळाडू शिल्लक राहिले त्यामुळे भारतावर लोन चढवणे इराणला सोपे गेले.घझलला बाद ठरवले असते तर भारत लोनाचे २ गुण सहज वाचवू शकला असता(२ गुण )
२.रणदीप खेराने चढाईत घझल खलाजला टिपल्याचा दावा पंचानी फेटाळला मात्र रणदीपने स्पष्टपणे घझलला स्पर्श केल्याचे दिसून आले.(१ गुण) याच घझलने भारताच्या पुढच्या चढाईत पायलची पकड केली आणि सामना आपल्या बाजूला झुकवला.
३.भारताच्या अखेरच्या चढाईतही साक्षी कुमारीची पकड करताना इराणच्या खेळाडूंकडून तिची जर्सी खेचण्यात आली तरीही ती पकड वैध ठरवण्यात आली
एकंदरीतच भारताला ६ ते ८ गुणांचा फटका बसला.शेवटी इराणने केवळ ३ गुणांनी भारताचा पराभव केला ही गोष्ट लक्षात घेता पंचांनी चूका टाळल्या असत्या तर सुवर्णपदक भारताचेच होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या महत्वाच्या सामन्यात पंचांकडून अशाप्रकारच्या चूका अजिबातच स्विकार्य नाहीत. ‘व्हीडीओ रेफेरल’ ची सुविधा का ठेवण्यात आली नाही हे देखील कळण्यापलीकडचे आहे.
इराणच्या संघ दिवसेंदिवस बलाढ्य होत चाललाय आणि त्यांनी या स्पर्धेतही चांगला खेळ केला हे मान्य मात्र संघनिवडीतील भ्रष्टाचार टाळला असता तर कदाचित भारताला हे पराभव बघावे लागले नसते हे ही तितकेच सत्य. काही अपवाद वगळता अनेक खेळाडूंनी वर्षानुवर्षे केलेली मेहनत आणि देशासाठी “गोल्ड” जिंकण्याचं बघितलेलं स्वप्न फेडेरेशनच्या सावळ्या गोंधळामुळे धुळीस मिळते या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही.
कारणे काहीही असली तरी कबड्डीच्या अनभिषिक्त सम्राटाला २८ वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर आपलया सिंहासनावरून थोड्या काळासाठी का होईना पायउतार व्हावे लागले आहे हे कटुसत्य नाकारता येत नाही.फक्त वाईट याच गोष्टिचे वाटते की सम्राटाला त्या सिंहासनावर खेचणारे कोणी परके नव्हते तर आपलेच होते..
“हमें तो अपनों ने लूटा,गैरो में कहा दम था ,
हमारी कष्टी थी डुबी, जहा पानी कम था І ”
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–पंड्या ब्रदर्स खेळणार २०१९ विश्वचषकात?
–किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकाला डच्चू
-टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त ‘०’ धावा
– ८२ वर्षांत जे कुणालाही जमले नाही ते विराट ब्रिगेडला करण्याची संधी