सध्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला. यासह मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) कोलकाताच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे.
भारतीय संघाने या मैदानावर पहिला टी२० सामना २०११ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ९ बाद १२० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने ८ चेंडू शिल्लक ठेऊन लक्ष्य पूर्ण केले होते.
त्यानंतर भारतीय संघाने २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा सामना केला होता. हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. त्यानंतर या मैदानावर टी२० विश्वचषक २०१६ स्पर्धेतील सामने खेळवले गेले होते. पाकिस्तान, बांगलादेश, अफगानिस्तान, श्रीलंका यांच्या संघांच्या सामन्यांचा समावेश होता. याच मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तान संघाला आयसीसी टी२० विश्वचषक २०१६ स्पर्धेत ६ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात विराट कोहलीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती.
त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद एमएस धोनीच्या हाती होते. या सामन्यात एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाने अडथळा निर्माण केलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाला १८ षटक अखेर ५ बाद ११८ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने हे आव्हान १५.५ षटकात पूर्ण केले होते. तसेच याच मैदानावर वेस्ट इंडिज संघाने २०१६ टी२० विश्वचषकाचे विजेतेपद इंग्लंडला पराभूत करत जिंकले होते.
तसेच भारतीय संघाने या मैदानावर शेवटचा टी२० सामना वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळला होता. त्यावेळी भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता. ४ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला ८ गडी बाद १०९ धावा करण्यात यश आले होते. हे आव्हान भारतीय संघाने १३ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले होते.
भारताच्या ईडन गार्डनवरील सामन्यांबद्दल आकडेवारीतून जाणून घ्यायचे झाल्यास, आत्तापर्यंत ४ टी२० सामने भारताने या मैदानावर खेळले आहेत. त्यातील १ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. याबरोबरच २ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी२० सामन्यासाठी ‘महा ड्रीम ११’; हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!
चिडका शाहीन आफ्रिदी!! आपल्या गोलंदाजीवर षटकार मारल्यानंतर फलंदाजाला फेकून मारला चेंडू, पाहा व्हिडिओ