2024-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाची स्थिती खराब असल्याचे दिसून आले. प्रथम त्यांना घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आणि नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाची नामुष्की ओढवली. दरम्यान, सर्वांना अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोन खेळाडूंची उणीव भासली. दोन्ही फलंदाज संघाचा भाग नव्हते, पण आता त्यापैकी एकाचे पुनरागमन होणार आहे. पुजाराने इंस्टाग्रामवर अशी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याच्या पुनरागमनाबद्दल चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
आयपीएल 2025 नंतर, भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाईल. दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकेत चेतेश्वर पुजारा पुनरागमन करू शकतो. त्याने त्याची पत्नी पूजा पाबारीसोबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यामुळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुजारा सध्या भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. 2024 मध्ये झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सौराष्ट्रासाठी शानदार कामगिरी केली आहे.
चेतेश्वर पुजाराने त्याच्या इंस्टा पोस्टद्वारे एक मोठा इशारा दिला आहे. फोटोमध्ये तो त्याच्या पत्नीसोबत उभा आहे आणि त्याने पूर्ण कसोटी सामन्याचा ड्रेस घातला आहे. त्याच्या हातात बॅटही आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे. काहीतरी रोमांचक घडणार आहे, त्यासाठी तयार राहा.”