fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

गुड न्यूज- केवळ तिसऱ्यांदा एक भारतीय अंपायर होणार आयसीसी एलिट पॅनेलचा सदस्य

India's Nitin Menon included in Elite Panel for 2020-21

भारताचे नितीन मेनन यांचा येत्या २०२०-२१ या मोसमासाठी आयसीसी पंचांच्या एलिट पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पॅनेलने घेतलेल्या वार्षिक आढाव्यानंतर आणि निवड प्रक्रियेनंतर नितीन यांची नियुक्ती करण्यात आली.या पॅनेलमध्ये आयसीसीचे सरव्यवस्थापक जेफ ऑलार्डिस, संजय मांजरेकर आणि सामना रेफरी रंजन मदुगले आणि डेव्हिड बून यांचा समावेश होता.

इंग्लंडच्या नायजेल लाँगच्या जागी नितीन मेनन यांची पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये निवड झाली आहे.

३६ वर्षीय नितीन पंचांच्या एलिट पॅनलमध्ये सामील होणारे सर्वात तरुण भारतीय पंच ठरले आहेत. तसेच पंचांच्या एलिट पॅनलमध्ये सहभागी होणारे ते तिसरे भारतीय आहेत. याआधी श्रीनिवास वेंकटराघवन आणि सुंदरम रवी देखील पंचांच्या एलिट पॅनलमध्ये सामील होते.

नितीन यांनी आत्तापर्यंत ३ कसोटी, २४ वनडे आणि १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात काम केले आहे. तसेच त्यांनी २ वेळा आयसीसी महिला टी२० विश्वचषकातही काम पाहिले आहे. २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करणाऱ्या नितीन यांच्या चांगल्या कामगिरीत सातत्य होते.

नितीन यांनी सुरुवातीला क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी मध्यप्रदेशकडून १६, १९ आणि २३ वर्षांखालील संघाकडून क्रिकेट खेळले. तसेच ते १९९६ ते २००४ पर्यंत अ दर्जाचे क्रिकेट खेळले. पण २२ व्या वर्षी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अंपायरिंग क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.

त्यांचे वडिल नरेंद्र मेनन देखील आंतरराष्ट्रीय पंच होते. नितीन २००६ ला बीसीसीआयची पंच परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर २००७-०८ पासून त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

तेव्हापासून केलेल्या कष्टाचे फळ आज त्यांना मिळाले आहे. त्यांचा आयसीसी पंचांच्या एलिट पॅनलमध्ये समावेश झाल्याबद्दल ते बीसीसीआयशी बोलताना म्हणाले, ‘माझ्यासाठी हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. वयाच्या 22 व्या वर्षी क्रिकेट सोडल्यानंतर मी पंच होण्याचे ठरविले तेव्हापासून आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये प्रवेश करणे हे माझे ध्येय होते. मला मिळालेल्या सर्व संधी आणि माझ्यावरील दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी बीसीसीआय आणि आयसीसीचा खूप आभारी आहे. मी भविष्याबद्दल उत्सुक आहे आणि मी माझी सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल.’

आयसीसी पंचांच्या एलिट पॅनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याबद्दल ते म्हणाले, ‘मागील काही काळापासून आपल्यापैकी कोणी एलिट पॅनलमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी नव्हते. आता मला आपल्या देशाचा झेंडा फडकवत ठेवायचा आहे. मला आशा आहे की भारतातील आणखी पंच अव्वल स्तरावर दिसतील. भारतीय पंचांना पुढे नेण्यासाठी आणि माझे अनुभव सांगून प्रत्येक संभाव्य मार्गाने मार्गदर्शन करण्याची ही एक मोठी संधी आणि मोठी जबाबदारी म्हणून मी पाहत आहे.’

याबरोबरच नितीन यांनी त्यांच्या कुटुंबाचे आणि आयसीसी पंच डेनिस बर्न्स यांचे आभार मानताना म्हटले आहे की ‘अखेर मी माझ्या कुटुंबाचे त्यांनी केलेल्या सर्व त्यागाबद्दल आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानतो. तसेच मी डेनिस बर्न्स यांनी दिलेल्या मार्गदर्शानाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.’

अ‍ॅड्रियन ग्रिफिथ (आयसीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक- पंच आणि रेफरी) म्हणाले, ‘नितीन सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आमच्या मार्गप्रणालीद्वारे पुढे आला आहे. एलिट पॅनेलमध्ये निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि तो सतत यश संपादन करत राहो, अशा शुभेच्छा देतो.’

दरम्यान, अलीम दार, कुमार धर्मसेना, मॅरेस इरास्मस, ख्रिस गॅफनी, मायकेल गफ, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, ब्रूस ऑक्सनफोर्ड, पॉल रेफेल, रॉड टकर आणि जोएल विल्सन यांनी एलिट पॅनेलमधील आपले स्थान पुढील मोसमासाठीही कायम राखले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

आजपासून पहा आशिया खंडातील टी२० लीगचा थरार, विश्वचषक गाजवलेला क्रिकेटर आहे प्रमुख आकर्षण

सुशांत सिंग आत्महत्येवरुन सुरु असलेल्या वादात शोएब अख्तरची उडी, म्हणे सलमान खान…

अखेर फाफ डुप्लेसीने केला धोनीच्या सीएकेच्या ड्रेसिंगरुममधील ‘त्या’ वातावरणाचा खुलासा

You might also like