पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२६ मार्च) पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे झालेला हा सामना ६ विकेट्सने जिंकला. यासह इंग्लंडने वनडे मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ४३.३ षटकात ६ विकेट्स राखून भारताचे भलेमोठे लक्ष्य पूर्ण केले.
भारताच्या ३३७ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो यांनी धमाकेदार सुरुवात केली. पंधराव्या षटकापर्यंत त्यांनी शतकी भागिदारी रचली. त्यापुढील षटकात रोहित शर्माच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळे भारताला जेसन रॉयच्या रुपात पहिले यश मिळाले. जेसन रॉय ५५ धावांवर धावबाद झाला.
त्यानंतर जॉनी बेयरस्टोने बेन स्टोक्ससोबत संघाचा डाव सावरला. त्यांनी मैदानावर तळ ठोकत संघाची धावसंख्या २०० पार नेली. बेन स्टोक्स ३५.२ षटकात नर्वस नाइंटीजचा (९९ धावा) शिकार ठरला. त्याला भुवनेश्वर कुमारने रिषभ पंतच्या मदतीने झेलबाद केले. त्यापुढील षटकात प्रसिद्ध कृष्णाने जॉनी बेयरस्टोला १२४ धावांवर तंबूत धाडले.
शेवटी डेविड मलान आणि पदार्पणवीर लियाम लिविंगस्टोन यांनी संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. डेविड मलान १६ धावांवर नाबाद राहिला. तर लियाम लिविंगस्टोन २७ धावांवर बिनबाद परतला.
भारताने उभारला ३३६ धावांचा डोंगर
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी यावे लागले. मात्र भारताला पहिला फटका लवकर बसला. सलामीवीर शिखर धवन ४ धावांवरच चौथ्या षटकात बाद झाला. त्याच्यानंतर काही वेळातच सलामीवीर रोहित शर्मा देखील २५ धावा करुन माघारी परतला.
यानंतर मात्र केएल राहुलने कर्णधार विराट कोहलीला शानदार साथ दिली. विराट आणि राहुलमध्ये १२१ धावांची शतकी भागीदारी झाली. या दोघांनीही या भागीदारीदरम्यान आपापले अर्धशतक पूर्ण केले. मात्र विराट आदिल राशिदच्या गोलंदाजीवर ६६ धावांवर बाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक जोस बटलरने घेतला. त्यामुळे रोहुल आणि विराटची भागीदारी तुटली.
विराट बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या रिषभ पंतने केएल राहुलला साथ देताना आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध आक्रमक अंदाजात फलंदाजी करताना ३ चौकार आणि ७ षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्यात आणि केएल राहुलमध्ये ८० चेंडूत ११३ धावांची भागीदारी झाली. अखेर ही भागीदारी तोडण्यात टॉम करनला यश आले. त्याने ११४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारासंह १०८ धावांची खेळी करणाऱ्या केएल राहुलला बाद केले.
पुढे ४७ व्या षटकात टॉम करनने पंतची वादळी खेळीला थांबवले. पंत ४० चेंडूत ७७ धावा करुन बाद झाला. यानंतर शेवटच्या षटकात हार्दिक पंड्या १६ चेंडूत ३५ धावा करुन बाद झाला. ५० षटकांच्या अखेरीस भारताने ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना रिस टोप्ली आणि टॉम करन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर सॅम करन आणि आदिल राशिदने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् राहुलच्या फ्लॉप शोवर पूर्णविराम! शतक केल्यानंतर पकडले कान, पाहा सेलिब्रेशनचा व्हिडिओ
पंतने चेंडू मारला सीमापार, तरीही टीम इंडियाला मिळाली नाही एकही धाव! वाचा कोणत्या नियमाचा बसलाय फटका
वनडे पदार्पणासाठी त्याने अजून काय करायला हवं? सूर्यकुमारला संधी न दिल्याने चाहत्यांचा विराटला प्रश्न