टी20 मालिकेनंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA)यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे, मात्र सामन्याला उशिर होण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. कारण सामन्याच्या बरोबर एक दिवस अगोदर लखनऊमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे तेथिल हवामान विभागाने गुरूवारीही पाऊस पडणार असा निष्कर्ष लावला आहे.
हवामान विभागाच्या रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशमध्ये पाऊस परतला आहे. बुधवारी राजधानी लखनऊबरोबरच अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे. हा पाऊस तीन दिवस पडणार असून काही शहरांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. यामध्ये लखनऊचा देखील समावेश आहे. यामुळे सामन्याच्या दिवशी संपूर्ण दिवस पाऊस पडणार असाही रिपोर्ट त्यांनी दिला आहे.
भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या वनडे सामन्यात भारत शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या स्टेडियमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सामन्याच्या दिवशी पाऊस नाही पडला तर कोणताही त्रास होणार नाही. स्टेडियमचे मालक उदय सिंहा यांनी म्हटले, “एकाना स्टेडियमची सोयसुविधा उत्तम आहे आणि पाऊस पडला तर 30 मिनिटांच्या आत मैदान खेळण्यायोग्य बनवण्याची क्षमता आहे.”
या स्टेडियममध्ये दोन्ही संघांनी एकही वनडे सामना खेळलेला नाही. या मैदानावर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन वनडे सामने खेळले गेले असून तिन्ही सामन्यात कॅरेबियन संघ विजेता ठरला आहे. भारताने या मैदानावर श्रीलंका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध टी20 सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. तसेच भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात मार्च 2020मध्ये येथे वनडे सामना होणार होता, मात्र तो सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेवन: शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी/रजत पाटीदार, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेईंग इलेवन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), जानेमन मलान, टेम्बा बावुमा, एडन मार्क्रम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, ऍंडिले फेलुक्वायो/ ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, एनरिच नोर्तजे/ मार्क जॅनसेन, लुंगी एनगिडी आणि कगिसो रबाडा.