आयपीएल २०२० च्या लिलावात सर्व संघांनी खेळाच्या तिन्ही विभागांना चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन आठवड्यांच्या खेळा नंतर पुन्हा एकदा सर्व फ्रेंचायझीचे प्रशिक्षक स्पर्धेत झालेल्या चुकांमधून शिकत आहेत आणि महत्त्वपूर्ण बदलांचा विचार करीत आहेत. टी-२० क्रिकेट हा फलंदाजाचा खेळ मानला जातो आणि आयपीएल स्पर्धा फलंदाजांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्रापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज या स्पर्धेचे प्रमुख दावेदार मानले जात होते, परंतु हा दावा स्पर्धेच्या काही सामन्यांनंतर बदलला आहे.
लिलावानंतर सर्व संघांचा फलंदाजी विभाग खूप मजबूत दिसत होता. परंतू आतापर्यंत झालेल्या २३ सामन्यांनंतर जोरदार फलंदाजी करण्यात हे ३ संघ आहेत सर्वात पुढे.
३. किंग्ज इलेव्हन पंजाब
केएल राहुल हे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे फलंदाजीतील सर्वात मोठे शस्त्र आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत ६२.६० च्या सरासरीने ३१३ धावा केल्या आहेत. तो फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर त्याचा साथीदार मयंक अग्रवाल सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत २८१ धावाांसह तिसर्या क्रमांकावर आहे. या सलामीच्या जोडीनंतर वेस्ट इंडिजचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरणने या मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या या स्पर्धेच्या २२ व्या सामन्यात त्याने १७ चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र, असे असूनही पंजाब संघाचा पराभव झाला. याशिवाय संघात ख्रिस गेलसारखा धोकादायक फलंदाज आहेत. पण त्याला अजून संघाने संधी दिली नाही. मात्र, ज्या दिवशी तो मैदानात परतेल त्या दिवशी चौकार – षटकारांच्या पाऊस बघायला मिळेल. परंतु आश्चर्याची बाब अशी की, या संघाकडे असे दिग्गज खेळाडू असूनही ते या हंगामात २ गुणांसह शेवटच्या क्रमांकावर आहे.
२. मुंबई इंडियन्स
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सने चार सामने जिंकून आतापर्यंत केवळ दोन सामने गमावले आहेत. या सर्व विजयात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचे मोठे योगदान आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी विभागाचे नेतृत्व करताना दिसतो. त्याने आतापर्यंत ६ सामन्यात ३५.१६ च्या सरासरीने २११ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादव सध्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने ६ सामन्यात ३६ च्या सरासरीने १८० धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित सहाव्या तर यादव दहाव्या क्रमांकावर आहे. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त, संघात ईशान किशनसारखा प्रतिभावान फलंदाज आहे जो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १ धावांनी शतकी खेळीला मुकला होता. हार्दिक आणि पोलार्ड नेहमीप्रमाणे शेवटच्या षटकांत चौकार – षटकार मारून जबरदस्त फलंदाजी करत आहेत.
या आयपीएल हंगामात हा संघ ८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
१. दिल्ली कॅपिटल्स
या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या गोलंदाजीनेच नव्हे तर फलंदाजीद्वारेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिल्लीने आतापर्यंत या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली आहे आणि म्हणूनच संघ ६ सामने खेळल्यानंतर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दिल्लीच्या फलंदाजीबद्दल विचार केला तर, त्याच्या सलामीच्या जोडीपासून मधल्या फळीपर्यंत सर्व जबरदस्त फलंदाज आहेत. या संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर पहिल्या दहामध्ये तर रीषभ पंत पहिल्या १५ मध्ये आहे.
या स्पर्धेत दिल्ली कॅपिटलच्या या तीन फलंदाजांच्या कामगिरीकडे पाहिले तर पृथ्वी शॉने ३३ च्या सरासरीने १९८ धावा केल्या आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरने ४०.६० च्या सरासरीने २०३ तर पंतने ३५.२० च्या सरासरीने १७६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावणार्या मार्कस स्टोनिस हे संघासाठी ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध होत आहे. याखेरीज अनुभवी शिखर धवन आणि शिमरॉन हेटमीयर सारखे फलंदाज संघात आहेत.