भारतीय संघाचा दिग्गज माजी खेळाडू एमएस धोनीची गणना जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याने आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला २००७ चा टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.
त्याने अनेक खेळाडूंना पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. अशामध्ये आता त्याचा माजी संघसहकारी राहिलेल्या आशिष नेहराने धोनीची प्रशंसा करत आपल्या नात्याबद्दल सांगितले आहे.
मजबूती आणि सातत्य
तो म्हणाला, “आपण जेव्हाही धोनीबद्दल चर्चा करता, त्यावेळी सर्वप्रथम तुमच्या लक्षात येते त्याची मजबूती आणि सातत्य. त्याने आपल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी अनेक कारणे निर्माण केली आहेत.”
‘एक तर तुम्ही जिंकाल किंवा काहीतर शिकाल पण तुम्ही पराभूत होत नाही’
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना नेहरा म्हणाला, “धोनीकडून खूप काही शिकता येऊ शकते. माझ्यासाठी धोनी असा सीनियर आहे, जो युवांसोबत नेहमी उभा राहतो. तो प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक पैलू पाहतो. तो नेहमी म्हणतो की, ‘एक तर तुम्ही जिंकाल किंवा काहीतरी शिकाल. तुम्ही कधीच पराभूत होत नाही.’ मी त्याच्यासोबत खेळलो आहे. मी त्याच्यासोबत जिंकलेल्या स्पर्धांविषयी बोलणार नाही. परंतु तो खूपच खास आहे.”
प्रत्येक व्यक्तीसाठी सकारात्मक ऊर्जा
“माझी त्याच्याशी एक वेगळ्या प्रकारची आत्मीयता आहे. तो नेहमी फोन जवळ ठेवणाऱ्या व्यकींपैकी नाही. आम्ही फोनवर चर्चा करत नाही. परंतु एक किंवा दोन वर्षांनंतर जेव्हाही आम्ही भेटतो, तेव्हा असे वाटते की आम्ही रोज भेटत आहोत. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी एक सकारात्मक ऊर्जा आहे,” असेही धोनीबद्दलच्या आपल्या नात्याबद्दल बोलताना नेहरा म्हणाला.
धोनीने स्वातंत्र्य दिनादिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला. तो सध्या आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी युएईत आपल्या चेन्नई सुपर किंग्स संघासाठी संघर्ष करताना दिसत आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी केवळ ३ सामने जिंकले आहेत, तर उर्वरित ७ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
त्यांचा पुढील सामना शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) शारजाह येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नईची साडेसाती संपेना! ‘हा’ खेळाडू आयपीएल २०२० हंगामातून झाला बाहेर
-‘युवांमध्ये नाही तर चावला-जाधवसारख्या वयस्करांमध्ये कसली प्रतिभा,’ माजी क्रिकेटरची धोनीवर टीका
-‘सलग तिसऱ्या वर्षी वयस्कर खेळाडूंसह खेळणे कठीण’
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
-धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे
-बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू