कोरोना व्हायरसचा जगातील वाढता प्रभाव पाहता जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये आयपीएलचाही समावेश आहे. आयपीएल सध्यातरी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण अजूनही आयपीएलचा हा मोसम होईल की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.
जर आयपीएलचा हा मोसम झाला नाही तर अनेकांचे मोठे नुकसान होणार आहे. यात सर्वाधिक नुकसान खेळाडूंचे होणार आहेत. कारण छोट्या गावापासून ते मोठ्या शहरापर्यंतचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असतात. तसेच त्यातून त्यांची चांगली कमाई देखील होते.
विशेष म्हणजे यावर्षीच्या आयपीएल मोसमातून १५ हून अधिक खेळाडूंना त्यांच्या संघाकडून १० कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये मिळणार आहेत. पण जर हा आयपीएल मोसम झाला नाही तर या खेळाडूंना या मोसमातून मिळणाऱ्या पैशांवर पाणी सोडावे लागणार आहे. आयपीएल झाली नाही तर सर्वाधिक नुकसान होणाऱ्या ५ खेळाडूंचा घेतलेला आढावा –
आयपीएलचा १३ वा मोसम झाला नाही तर या ५ खेळाडूंना होणार सर्वाधिक नुकसान –
१. विराट कोहली –
भारताचा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेेळाडू आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर २०१८ पासून १७ कोटी रुपये प्रत्येकवर्षी देत आहे. त्याला २०१८ ला बेंगलोरने १७ कोटी रुपये देण्याचा करार करत संघात कायम केले होते. त्यामुळे जर आयपीएल यावर्षी रद्द झाले तर विराटला १७ कोटींचे नुकसान होणार आहे.
विराट हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने १७७ सामन्यात ५४१२ धावा केल्या आहेत.
२. पॅट कमिंन्स –
ऑस्ट्रेलियााचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स २०२० च्या आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरलेला खेळाडू आहे. त्याला या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने १५ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केले आहे. पण असे असले तरी जर यावर्षीचा आयपीएल मोसमचे आयोजन झाले नाही. तर त्याला १५ कोटी ५० लाखांचे नुकसान होऊ शकते.
आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत १६ सामने खेळले असून एकूण १७ विकेट्स घेतल्या आहेत.
३. एमएस धोनी –
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला जर यावर्षीचा आयपीएल मोसम झाला नाही तर १५ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. २०१८ला चेन्नई सुपर किंग्सने २ वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करताना धोनीला संघात कायम केले होते.
त्यावेळी चेन्नईने २०१८ आयपीएल लिलावाआधी खेळाडूंना संघात कायम करण्याच्या आयपीएलच्या नियमानुसार १५ कोटी रुपयांना त्याला कायम केले होते. त्यांनंतर त्यांनी त्याला २०१९ आणि २०२० आयपीएलसाठी १५ कोटी रुपयांनाच संघात कायम केले आहे. धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १९० सामने खेळताना ४४३२ धावा केल्या आहेत.
४ – रिषभ पंत –
धोनीप्रमाणेच दिल्ली कॅपिटल्सने (आधीचे नाव दिल्ली डेअरडेविल्स) रिषभ पंतलाही २०१८ च्या आयपीएल लिलावाआधी खेळाडूंना संघात कायम करण्याच्या आयपीएलच्या नियमानुसार १५ कोटी रुपयांना कायम केले होते.
त्यांनी त्याला २०१९ आणि २०२० आयपीएलसाठीही १५ कोटी रुपये देण्याचा करार करत संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे त्यालाही जर आयपीएलचा १३ वा मोसम झाला नाही तर १५ कोटींचे नुकसान होऊ शकते. रिषभने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ५४ सामने खेळले असून १७३६ धावा केल्या आहेत.
५. रोहित शर्मा –
मुंबई इंडियन्सला ४ आयपीएल विजेतीपदे मिळवून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्मालाही जर आयपीएलचा १३ वा मोसम झाला नाही तर १५ कोटींचे नुकसान होणार आहे. त्यालाही मुंबई इंडियन्सने २०१८ ला १५ कोटींमध्ये कायम केले होते. तसेच त्यांनी याच किंमतीचा करार करत त्याला २०१९ आणि २०२०साठीही संघात कायम ठेवले आहे. रोहितने आत्तापर्यंत १८८ आयपीएल सामन्यात ४८९८ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
७ एकरांवर आहे धोनीचं फार्महाऊस, ५ स्टार हाॅटेल व इनडोअर स्टेडियमसह या आहेत सुविधा
अबब! विराट एका दिवसाला कमावतो ७० लाख रुपये, कसे ते घ्या जाणून