आयपीएल २०२०चा १९ वा सामना मंगळवारी (६ ऑक्टोबर) अबू धाबी येथे मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात होणार आहे. मुंबई संघाचा हा हंगामातील सहावा सामना आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला नवीन विक्रम करण्याची संधी आहे.
रोहितने आतापर्यंत या हंगामात २ अर्धशतके ठोकली आहेत. जर राजस्थानविरुद्धच्या सामन्यातही रोहितने अर्धशतक ठोकले, तर तो ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचा विक्रम मोडेल.
आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना आणि रोहित संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. रोहित आणि रैनाच्या नावावर एकूण आयपीएलमध्ये प्रत्येकी ३८ अर्धशतके आहेत. तरीही रोहितने राजस्थानविरुद्ध अर्धशतक केले तर तो या विक्रमात रैनाला मागे टाकेल आणि या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान होईल.
तसे, आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत १३१ सामने खेळताना ४५ अर्धशतके ठोकली आहेत.
रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३८ अर्धशतकांसह ३१.७१ च्या सरासरीने ५०७४ धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे क्रिकेटपटू –
४५ – डेव्हिड वॉर्नर
३८ – सुरेश रैना
३८ – रोहित शर्मा
३७ – विराट कोहली
३७ – शिखर धवन