आयपीएल २०२० मधील आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये फलंदाजांबरोबरच गोलंदाजांचेही वर्चस्व दिसले आहे. कारण लक्ष्याचा पाठलाग करताना बऱ्याच संघांनी बहुतेक सामने गमावले आहेत. १९ सप्टेंबर पासून आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात झाली. १९ सप्टेंबर पासून ते ३० सप्टेंबर पर्यंत झालेल्या १२ सामन्यामध्ये गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि त्यांच्या संघासाठी सामने जिंकले. पहिल्या १२ सामन्यांत आपला जलवा दाखविणार्या पहिल्या ५ गोलंदाजांबद्दल या लेखात जाणून घेऊया.
शिवम मावी
कोलकाता नाइट रायडर्सचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या २ हंगामात दुखापतीमुळे त्याला संधी मिळू शकल्या नाहीत. परंतु यावर्षी त्याने आपल्या कलागुणांनी कोलकाताच्या संघाकडून पहिल्या ३ सामन्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्याने सप्टेंबर महिन्यात खेळलेल्या ३ सामन्यात ४ बळी घेतले आहेत.
सॅम करन
चेन्नई सुपर किंग्ज संघाची या हंगामात सुरुवातीचा एक सामना सोडला तर बाकी सामन्यात चांगली कामगिरी दिसली नाही, तरी इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज सॅम करनने चेन्नईकडून खेळताना आपली क्षमता दाखवून सर्वांना प्रभावित केले आहे. डावाच्या सुरूवातीला किंवा डेथ ओव्हर गोलंदाजीमध्ये त्याने आपली जादू दाखवून या युवा खेळाडूने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. सप्टेंबर महिन्यातील ३ सामन्यात त्याने ५ बळी मिळवले आहेत.
युजवेंद्र चहल
बेंगलोरचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलचा लेग स्पिन स्पेलही या हंगामात जादू करत आहे. विराट कोहलीचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज म्हणून त्याने संघाच्या फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळली असून त्याने या हंगामात बेंगलोरच्या सुरुवातीच्या ३ सामन्यात संघासाठी विकेट घेऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. चहलने सप्टेंबर महिन्यातील ३ सामन्यात त्याने ५ बळी मिळवले आहेत.
कागिसो रबाडा
या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने शानदार पदार्पण केले असून त्यांनी ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. दिल्लीच्या विजयाचे श्रेय त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीला जाते, त्यातील जास्तीत जास्त योगदान वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याचे आहे. रबाडाने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांत ७ बळी मिळवले आहेत, तसेच पंजाब विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.
मोहम्मद शमी
मोहम्मद शमी गेली अनेक वर्षे भारतीय संघासाठी चांगली गोलंदाजी करत आहे. आयपीएलमध्येही त्याने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. शमीने सप्टेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांत ७ बळी घेतले आहेत. पंजाबची गोलंदाजी धुरा शमीच्या हाती आहे.