मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळतोय. तो स्नायू दुखापतीने त्रस्त आहे. गुरुवारी(24 सप्टेंबर) किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती संघाचे संचालक माईक हेसन यांनी दिली. आरसीबीने मॉरिसला दहा कोटींमध्ये लिलावादरम्यान विकत घेतले आहे. याआधी विराट सेनेने जिंकलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा पहिला सामना देखील तो खेळू शकला नव्हता.
आरसीबीच्या ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत हेसन म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी ख्रिस मॉरिसचा स्नायू दुखावला आहे. गोलंदाजीमध्ये तो मधल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असून तो फलंदाजीमध्येही उपयुक्त आहे. त्याच्यामुळे संघातील संतुलन चांगले होईल, कारण तो ‘थ्री इन वन क्रिकेटर’ आहे, त्याची जागा घेणे सोपे नाही. एक किंवा दोन सामन्यात ठीक होऊन तो संघात परतेल, अशी आशा आहे.”
आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा सहावा सामना आज(24 सप्टेंबर) दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाईल. या दोन संघातील गेल्या 4 सामन्यात बेंगलोरने पंजाबचा पराभव केला आहे. त्याचवेळी 2014 मध्ये दुबईमध्ये दोन्ही संघांमध्ये सामना खेळला गेला होता, त्यात पंजाबचा विजय झाला होता. या हंगामात पंजाबने आपला पहिला सामना दिल्लीविरुद्ध खेळला, जो दिल्लीने सुपर आव्हरमध्ये जिंकला. त्याचवेळी बेंगलोरने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी पराभूत केले.