रनमशीन नावाने क्रिकेट जगतात परिचित असलेल्या विराट कोहलीने एक फलंदाज म्हणून प्रत्येक विक्रम स्वतःच्या नावावर करण्याचा जणू संकल्पच केलेला दिसत आहे. यासाठी त्याच्या बॅटमधून तो धावांचा अविरत पाऊस देखील पाडत असतो. याच प्रयत्नांचे फलित म्हणून त्याच्या नावावर सतत काहीना काही विक्रम होतच असतात. नुकताच त्याने आयपीएलच्या १३ व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना खेळत असताना एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
“विराट कोहली हा आता आयपीएलमध्ये ५०० पेक्षा अधिक चौकार लगावणारा दुसरा खेळाडू बनला आहे.”
कोलकाता नाईड रायडर्स विरुद्ध खेळताना विराटकडून नव्या विक्रमाला गवसणी…
बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर २०२०) कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने एका चौकारासह आयपीएलमधील त्याचे चौकारांचे ५ वे शतक पूर्ण केले. यासह तो अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू ठरला आहे.
या अगोदर भारताच्याच खेळाडूने केलाय हा पराक्रम…
विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर मग पहिल्या क्रमांकावर कोण? हा प्रश्न अनेकांना पडला असेलच. परंतु, विराटच्याही अगोदर एका खेळाडूने हा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. आणि हा खेळाडू इतर कोणी नसून भारताचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन हा आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर एक नजर…
शिखर धवनने १६९ सामने खेळले असून यात त्याने ३५.०२ च्या सरासरीने ५ हजार ४४ धावा केल्या आहेत. ज्यात त्याच्या ५७५ चौकार आणि १०६ षटकारांचा समावेश आहे. यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर आहे, विराट कोहली. कोहलीने आजवर १८७ सामने खेळले असून यात त्याने ३८.७७ च्या सरासरीने ५ हजार ७७७ धावा कुटल्या आहेत. विराटच्या या धावांमध्ये ५०० चौकार आणि तब्बल १९९ षटकार आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सुरेश रैनाचे नाव आहे. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये एकूण १९३ सामने खेळले असून त्यात त्याने ४९४ चौकार आणि १९४ षटकारांच्या सहाय्याने ५ हजार ३६८ धावा केल्या आहेत. रैना यावर्षी आयपीएल खेळत नसल्याने त्याच्या या अंकांमध्ये यावर्षी कोणती भर पडणार नाही. यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे, तो गौतम गंभीर. गंभीर हा देखील सध्या स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, त्याने आजवर आयपीएलमध्ये १५४ सामन्यात ४९१ चौकार लगावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-“तुमच्याकडे सर्व योजना असतात पण…”, केकेआरविरुद्धच्या विजयानंतर कोहलीची खास प्रतिक्रिया
-कोलकाताच्या फलंदाजांना लोळवणाऱ्या सिराजला विराटने सामन्याआधी दिला होता ‘हा’ खास संदेश
-‘त्याला अगदी मनाप्रमाणे बाद केले’, आपल्या गोलंदाजीने केकेआरला इंगा दाखवणाऱ्या सिराजची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
-आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
-आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज