मागील आठवड्यात आयपीएल २०२१ चे बिगुल वाजले. खेळाडूंना कायम राखण्याच्या व करारमुक्त करण्याच्या प्रक्रियेने याला सुरुवात झाली. त्याचबरोबर, आयपीएलच्या पुढील हंगामासाठी होणारा खेळाडूंचा लिलाव कधी होईल, याबाबत क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. आता मात्र, आयपीएल २०२१ च्या लिलावाची तारीख समोर आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान होणाऱ्या दुसऱ्या कसोटीनंतर चेन्नई येथेच हा लिलाव पार पडेल.
या तारखेला होईल खेळाडूंचा लिलाव
एका स्थानिक वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, चेन्नई येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीनंतर चेन्नई येथेच आयपीएल २०२१ साठीचा खेळाडूंचा लिलाव पार पडेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी १७ फेब्रुवारी रोजी संपन्न होईल. त्यानंतर, १८ किंवा १९ फेब्रुवारी या दोन दिवसांपैकी एका दिवशी हा लिलाव घेण्यात येईल.
आयोजन स्थळाबाबतही होईल चर्चा
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले, “दुसऱ्या कसोटीनंतर त्वरित आम्ही लिलाव घेण्याचा विचार करत आहोत. १७ तारखेला दुसरी कसोटी संपल्यावर दोन दिवसात लिलावाची प्रक्रिया पार पडेल. सोबतच, आम्ही आयपीएलच्या आगामी हंगामाच्या स्थळाबाबत चर्चा करू. मागील वर्षी आपण आयपीएल युएईमध्ये खेळवली. मात्र, यावेळी ही मोठी स्पर्धा भारतात खेळवण्याचा आमचा मानस आहे. आगामी विश्वचषकाच्या अनुषंगाने आयपीएल भारतात होणे, आपल्या फायद्याचे ठरेल.”
तो अधिकारी पुढे म्हणाला, “आयपीएल भारतात करणे आमची प्राथमिकता असेल. सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. ही भारताची स्पर्धा असल्याने ती भारतात करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू. मागील वर्षी युएईत तेथील क्रिकेट मंडळाने आम्हाला चांगले सहकार्य केले. भारतातील सर्व विभागांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही आयपीएल भारतातच आयोजित करू.”
आयपीएल २०२१ ची चर्चा झाली सुरू
आयपीएल २०२१ ची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. संघांनी अनेक बडे खेळाडू करारमुक्त केले. यात ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल यांसारखे दिग्गज समाविष्ट आहेत. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स संघाने अनुभवी भारतीय फलंदाजी रॉबिन उथप्पा याला राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड करत आपल्या संघात सामील केले.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! तब्बल सात खेळाडू ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी, भारत सरकारने केली घोषणा