चेन्नई। रविवारी(११ एप्रिल) एमए चिदंबरम स्टेडियमवर इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. हा सामना कोलकाताने १० विकेट्सने जिंकला. हा विजय कोलकातासाठी खास ठरला. या विजयासह कोलकाताने खास विक्रम केला आहे.
कोलकाताचा हा आयपीएल इतिहासातील १०० वा विजय ठरला. त्यामुळे कोलकाता आयपीएलमध्ये १०० विजय मिळवणारा एकूण तिसरा संघ ठरला. यात सुपर ओव्हरमध्ये मिळवलेल्या विजयांचाही समावेश आहे. कोलकाताने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १९३ सामने खेळले आहेत. त्यातील ९९ सामन्यांत निर्धारित २०-२० षटकांत विजय मिळवला आहे. तर १ सामना कोलकाताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला आहे.
कोलकातापूर्वी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांनाच १०० पेक्षा अधिक विजय आयपीएलमध्ये मिळवता आले आहेत. मुंबईने आयपीएलमध्ये २०४ सामने खेळताना ११८ सामन्यांत निर्धारीत २०-२० षटकांत विजय मिळवले आहेत. तर २ सामने त्यांनी सुपर ओव्हरमध्ये जिंकले आहेत. तसेच चेन्नईने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १८० सामने खेळले असून यातील सर्व १०६ विजय त्यांनी निर्धारित २०-२० षटकांतच जिंकले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
१२० विजय – मुंबई इंडियन्स, २०४ सामने (११८ निर्धारित षटकांत विजय + २ सुपर ओव्हरमधील विजय)
१०६ विजय – चेन्नई सुपर किंग्स, १८० सामने (१०६ निर्धारित षटकांत विजय)
१०० विजय – कोलकाता नाईट रायडर्स, १९३ सामने (९९ निर्धारित षटकांत विजय + १ सुपर ओव्हरमधील विजय)
कोलकाताने उभारला होता १८७ धावांचा डोंगर
या सामन्यात हैदराबादने कोलकाताला नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत कोलकाताने २० षटकात ६ बाद १८७ धावा धावफलकावर लावल्या.
त्यांच्याकडून नितीश राणाने ५६ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ८० धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने २९ चेंडूत ५३ धावा केल्या आणि अखेरच्या काही षटकांत दिनेश कार्तिकने ९ चेंडूत नाबाद २२ धावांची आक्रमक खेळी केली. हैदराबादकडून मोहम्मद नबी आणि राशिद खानने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १ विकेट घेतली.
हैदराबादला धावांचा पाठलाग करण्यात आले अपयश
कोलकाताने दिलेल्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. त्यांचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर(३) आणि वृद्धिमान साहा(३) लवकर बाद झाले. पण यानंतर बेअरस्टो आणि मनिष पांडेने डाव सांभाळत ९२ धावांची भागीदारी केली. या दोघांनीही अर्धशतके केली.
बेअरस्टोने ४० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावा केल्या. तर पांडे अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने ४४ चेंडूत ६१ धावा केल्या. त्याला अखेरच्या काही षटकांत अब्दुल सामदने ८ चेंडूत नाबाद १९ धावा करत चांगली साथ दिली. मात्र, पांडे आणि सामदचे प्रयत्न तोकडे पडले आणि हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर शाकिब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसलने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
अफलातून! अब्दुल सामदने बाऊंड्री लाईनजवळ मॉर्गनचा घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ
कमाल लाजवाब…! गिलचा हा अफलातून षटकार बघून तुम्हीही असंच म्हणाल, पाहा व्हिडिओ