आयपीएल 2021ला सुरूवात होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले असून या संदर्भात बीसीसीआयने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला जाहीर झालेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये आयपीएलच्या 14 व्या सत्राचा पहिला सामना होणार आहे.
यापूर्वी 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे झालेल्या लिलावात आयपीएलमधील सर्व संघांनी अनेत खेळाडूंवरती बोली लावली होती. त्यानंतर सर्व संघ पूर्ण तयार झाले आहेत. तर आज आपण या आयपीएल 2021 च्या 8 संघांमधील 1 सर्वात बलवान आणि 1 कमकुवत खेळाडूबद्दल चर्चा करणार आहोत.
1.रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये खेळणारा आरसीबी संघ यंदा आपला आयपीएल चषकाचा दुष्काळ संपेल या आशेने मैदानात उतरणार आहे. या संघातील सर्वात बलवान आणि कमकुवत खेळाडूबद्दल जर आपण विचार केला तर दक्षिण आफ्रिकेचा माजी एबी डिव्हिलियर्स 2011 पासून या संघाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. आयपीएलमधील एकूण कामगिरीचा विचार केला तर त्याने 169 सामन्यांत 40.41 च्या प्रभावी सरासरीने 4849 धावा फटकावल्या आहेत.
तर या संघाच्या कमकुवत खेळाडूचा विचार केला तर 28 वर्षांचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांचे नाव पुढे येते. त्याने आयपीएलच्या 26 सामन्यांमध्ये केवळ 17 बळी घेतले आहेत.
2. पंजाब किंग्ज
पंजाब किंग्ज या संघाने मागील वर्षी कर्नाटकचा 29 वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलच्या नेतृत्वाखाली बरी कामगिरी केली होती. विशेष म्हणजे संघाचा कर्णधार केएल राहुलच या संघाचा सर्वात मजबूत खेळाडू आहे. त्याने 81 सामन्यांत 44.86 च्या प्रभावी सरासरीने 2647 धावा केल्या आहेत. तसेच त्याने मागील हंगामातही 670 धावा फटकावल्या होत्या.
तर या संघाच्या कमकुवत खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर मनदीप सिंगचे नाव प्रथम येते. मनदीपने राहुलपेक्षा सामने जास्त खेळले आहेत. पण तरीही त्याने आत्तापर्यंत 104 सामन्यांत 22.12 च्या सरासरीने 1659 धावा केल्या आहेत.
3. दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सच्या सर्वात मजबूत खेळाडू याबद्दल जर विचार केला तर जोहान्सबर्गचा 25 वर्षीय वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाचे नाव अव्वल स्थानी आहे. 2017 मध्ये आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रबाडाने 18.09 च्या उत्कृष्ट गोलंदाजी सरासरीने एकूण 35 सामन्यांत 61 बळी घेतले आहेत.
तर दुसरीकडे जेव्हा कमकुवत खेळाडूबद्दल चर्चा करायची म्हटली तर नागपूरचा 33 वर्षीय वेगवान गोलंदाज उमेश यादव या यादीत अव्वल स्थानी येतो. कारण त्याने आयपीएल मधील 121 सामने खेळताना 30.8 च्या महाग गोलंदाजी सरासरीने 119 बळी घेतले आहेत.
4.चेन्नई सुपर किंग्ज
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जमधील सर्वात बळकट खेळाडूबद्दल सांगायचे झाले तर, 32 वर्षीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे नाव प्रथम येते. कारण त्याने आयपीएलमधील 184 सामन्यांमध्ये फलंदाजीमध्ये 25.4 च्या सरासरीने 2159 धावा केल्या आहेत तर दुसरीकडे गोलंदाजीत त्याने 114 बळी घेतले आहेत.
परंतु, या संघातील सर्वात कमकुवत खेळाडूचा जर विचार केला तर कसोटीपटू म्हणून ओळख मिळवलेला चेतेश्वर पुजाराचे नाव पुढे येते. राजकोटच्या या क्रिकेटपटूने आयपीएलचे 30 सामने खेळताना 20.53 च्या सरासरीने फक्त 390 धावा केल्या आहेत.
5.सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद संघातील सर्वात मजबूत खेळाडू कोण असेल तर तो 34 वर्षीय ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरने आपल्या आयपीएल कारकीर्दीला 2009 मध्ये सुरुवात केली होती. तेव्हापासून त्याने या लीगमध्ये एकूण 142 सामने खेळताना 42.72 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीने 5254 धावा केल्या आहेत.
तर या संघातील कमकुवत खेळाडू म्हटले तर 23 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज खलील अहमद आहे. कारण खलीलने 17 सामन्यांत 21 च्या सरासरीने केवळ 27 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडे या संघातील कमकुवत खेळाडू म्हणून पाहिले जाते.
6. कोलकाता नाइट रायडर्स
मागील हंगामात दोन कर्णधारांसह खेळलेला कोलकाता नाइट रायडर्स संघ या वेळी आयपीएलमधील तिसरे विजेतेपद पटकावण्याचे ध्येय पुढे ठेवून मैदानात उतरणार आहे. आपण जर या संघातील सर्वात सामर्थ्यवान खेळाडू कोण असेल असा विचार केला तर तो खेळाडू इंग्लड कर्णधार आणि अनुभवी फलंदाज ओएन मॉर्गन हा आहे. या इंग्लडच्या कर्णधाराने 66 आयपीएल सामन्यांमध्ये 25.44 च्या सरासरीने एकूण 1272 धावा केल्या आहेत.
तर दुसरीकडे कमकुवत खेळाडू म्हटले तर जोधपूरचा 29 वर्षीय फलंदाज करुण नायर हा आहे. कारण नायरने आयपीएलमध्ये 73 सामने खेळताना 24.26 च्या फलंदाजी सरासरीने 1480 धावा केल्या आहेत. तर याशिवाय त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्याचा अभाव दिसून आला आहे.
7.राजस्थान रॉयल्स
आयपीएलचे पहिला चषक जिंकणारा राजस्थानचा संघ अद्यापही आपले दुसरे आयपीएल विजेतेपदाच्या शोधात आहे. या संघाकडून मागील काही हंगामात राहुल द्रविड सारखे महान क्रिकेटपटू खेळले आहेत. पण सध्या संघातील सर्वात बळकट खेळाडूविषयी बोलायचे झाले तर तो इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर आहे. बटलरने 58 आयपीएल सामन्यात 34.98 च्या फलंदाजीच्या सरासरीने 1714 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे जर आपण या संघातील सर्वात कमकुवत खेळाडूबद्दल सांगायचे म्हटले तर तो 29 वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा आहे. त्याने आयपीएलचाय 80 सामन्यांमध्ये 29.88 च्या गोलंदाजी सरासरीने केवळ 81 विकेट्स घेतल्या आहेत. परंतु असे असूनही राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाने त्याला मागील 3 वर्षांपासून सतत आपल्यासोबत जोडले आहे.
8. मुंबई इंडियन्स
आयपीएलचे 5 वेळा विजेतेपद पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्सन संघाने 33 वर्षीय भारतीय सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वात मागील 2 हंगामात सलग विजेतेपद मिळवले आहे. या संघातील सर्वात बळकट खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर 27 वर्षीय भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नाव पुढे येते. बुमराहने आत्तापर्यंत आयपीएलचे 92 सामने खेळताना 23.73 च्या चांगल्या गोलंदाजी सरासरीने 109 विकेट घेतल्या आहेत.
तर या संघातील कमकुवत खेळाडू म्हटले तर 31 वर्षीय फलंदाज सौरभ तिवारीचे नाव पुढे येते. कारण तिवारीने आयपीएलमधील 88 सामन्यांमध्ये 27.58 च्या फलंदाजी सरासरीने केवळ 1379 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरला दिलासा! कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूचा आता रिपोर्ट आला निगेटिव्ह; सुरु करणार ट्रेनिंग
आयसीसीने ‘अंपायर्स कॉल’ हटवण्यास दिला नकार, क्रिकेट समीती प्रमुख अनिल कुंबळेने सांगितले कारण
आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला! टी नटराजनला मिळाली थार, त्यानेही पाठवले ‘हे’ खास रिटर्न गिफ्ट