सध्या भारतासह जगभरात इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १५ व्या हंगमाची चर्चा होत आहे. आता बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान देखील आयपीएलच्या चर्चेत सहभागी झाला आहे. आमिर खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आयपीएलमध्ये त्याला संधी मिळू शकते का असे विचारत आहे.
बॉलिवूडचा ५७ वर्षीय अभिनेता आमिर खान (Aamir Khan) मोजक्याच चित्रपटांमधून चाहत्यांच्या भेटीला येत असतो. आगामी काळात त्याचा ‘लाल सिंग चड्डा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि प्रमुख पात्र आमिरचे असणार आहे. आमिर खान आणि खेळ हे नाते तसे नवीन नाही. त्याने ‘लगान’ आणि ‘दंगल’ असे खेळावर आधारित सुपरहिट सिनेमे दिले आहेत. या दोन्ही चित्रपटांमधील आमिरचे काम हे सर्वोच्च दर्जाचे आहे आणि यासाठी त्याचे खूप कौतुक देखील केले गेले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आमिर खान प्रोडक्शन या त्याच्या मॅनेजमेंटकडून चालवल्या जाणाऱ्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओत आमिर प्रोडक्शनच्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. यावेळी आमिर चेंडूला उत्कृष्टरीत्या डिफेंस करताना दिसत आहे. एक चांगला शॉट खेळल्यानंतर तो म्हणतो की, “आयपीएलमध्ये संधी आहे का?” त्यानंतर पुढचा चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळतो आणि २८ तारखेला चाहत्यांना एक गोष्ट सांगणार असल्याचे देखील तो म्हणतो. या व्हिडिओनंतर आमिर २८ तारखेला नेमके काय सांगणार आहे, याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
आयपीएल २०२२ हंगामातील आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांचा विचार केला, तर चालू हंगामातील अर्धे सामने खेळले गेले आहेत. यावर्षी लीग स्टेजमध्ये ७० सामने खेळले जाणार आहेत. शनिवारी त्यापैकी ३६वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये पार पडला. यामध्ये हैदराबाद संघाने आरसीबीचा लाजिरवाणा पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने ९ विकेट्स राखून विजय मिळवला.